महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुडचडे सेंट्रल बँकेचा व्यवस्थापक गजाआड

12:52 PM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खातेधारकांचे पैसे, दागिने लुटण्याचे प्रकरण : दोन्ही संशयितांना दोन दिवस पोलीस कोठडी, खातेदारांकडून आतापर्यंत तीन तक्रारी नोंद

Advertisement

कुडचडे : कुडचडेतील सेंट्रल बँक शाखेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात पैसे तसेच सोन्याचे दागिने लुटल्याचा आरोप असलेल्या तन्वी वस्त हिला तक्रारी आल्यानंतर सोमवारी दुपारी कुडचडे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर रात्री उशिरा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कुडचडे शाखेचा व्यवस्थापक आनंद जाधव यालाही अटक केल्याची माहिती कुडचडे पोलिसस्थानकातून प्राप्त झाली आहे. संशयित आरोपी वस्त व जाधव यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून तीन तक्रारी पोलिसस्थानकात नोंद झालेल्या आहेत. त्यावर निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अऊण अँड्य्रू हे तपास करत आहेत. याप्रकरणी 19 नोव्हेंबरपासून कुडचडेत माजलेला गोंधळ बरेच काही सांगून गेला होता. पण यासंबंधी कोणीच लेखी तक्रार न केल्याने पोलिस हतबल झाल्याचे दिसून आले होते.

Advertisement

ह्रदयरोगी असल्याने तक्रारीस उशीर 

या प्रकरणातील तक्रारदार महिला ही हृदयरोगी असून ती औषधोपचार घेत आहे. तिचा मुलगा विदेशात कामाला आहे. त्यामुळे तक्रार केल्यावर आपल्यावर पोलिसस्थानक व इतर ठिकाणी परत परत जाण्याचा प्रसंग येईल व ते आपल्याला कठीण जाईल या भीतीने तिने तक्रार करण्यास दिरंगाई केल्याची माहिती हाती आली आहे. ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर मंगळवार दि. 26 रोजी सेंट्रल बँकेच्या खातेधारकांनी आपल्या खात्यांबद्दल माहिती मिळविण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कुडचडे शाखेत गर्दी केली. त्यातून बऱ्याच त्रुटी व गैरप्रकार समोर आले असून त्यासंबंधी पूर्ण खात्री झाल्यावर पोलिसस्थानकात तक्रार करणार असल्याची माहिती उपस्थित खातेदारांनी दिली.

आमदार काब्राल यांनी घेतली माहिती

सोमवारी ज्येष्ठ नागरिकांना फसविल्याप्रकरणी संशयित आरोपी तन्वी वस्तला अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांनी या घटनेत फसविल्या गेलेल्या महिलेच्या घरी भेट दिली. त्यानंतर सेंट्रल बँकेच्या कुडचडे शाखेलाही त्यांनी दिली आणि तेथे उपस्थित असलेल्या खातेधारकांशी चर्चा केली तसेच गैरप्रकार घडलेला असल्याचे नजरेस आल्यास तक्रार करण्यास सुचविले. तसेच कुडचडे पोलिसस्थानकाला भेट देऊन निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्याकडून नोंद झालेल्या तक्रारी व तपासकार्याबद्दल माहिती घेतली.

महिलेच्या घरी जाऊन पोलिसांनी घेतली तक्रार

यासंबंधी माहिती देताना आमदार काब्राल यांनी सांगितले की, कुडचडेत जे कृत्य घडले आहे ते बरोबर नाही. याप्रकरणी कडक कारवाई होणार असून तपासात कोणतीच त्रुटी राहणार नाही. गुन्हे उघडकीस येऊन सहा दिवस झाले, तरी कोणी लेखी तक्रार दिली नव्हती. पण सोमवारी सातव्या दिवशी पोलिसांनी फसविल्या गेलेल्या महिलेच्या घरी जाऊन तक्रार नोंद करून घेतली. या प्रकरणी पोलिस कसून चौकशी करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

गैरप्रकार घडलेला असल्यास तक्रार करा

आमदार काब्राल यांनी लोकांना आपापल्या खात्यांची तपासणी करून गैरप्रकार घडलेला दिसल्यास पोलिसस्थानकात तक्रार करावी, असे आवाहन यावेळी केले.  पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत लाखो ऊपयांची लूट झाल्याचे उघडकीस आले आहे व पुढे हा आकडा कुठवर पोहोचेल हे सांगता येत नाही. कदाचित तो कोट्यावधींवर जाऊ शकतो. त्यामुळे आपण खातेधारकांना तक्रार करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी योग्य कारवाई पोलिस करणारच आहेत. तरीही आपण याबद्दल लगेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बँकेच्या चुकीसंदर्भात चौकशी होईल : काब्राल

राष्ट्रीयीकृत बँक अशा प्रकारे एका खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्याला बँकेच्या कामात गुंतवते ही बँकेची मोठी चूक आहे. त्यासंबंधी शंभर टक्के चौकशी करण्यात येईल. याला सरकार जबाबदार नसून अशा घटना घडल्यानंतर फसलेल्यांनी सर्वप्रथम कायदेशीर तक्रार करणे आवश्यक असते. जर कोणीच लेखी तक्रार केली नाही, तर कायदेशीर कारवाई कशी करायची असा मोठा प्रश्न निर्माण होतो. सध्या लोक आपल्या पैशांवर जास्त व्याज मिळावे म्हणून अशा दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेवतात आणि नंतर लुटले गेल्याची कैफियत मांडतात. यात कोणतीच सरकारी यंत्रणा काहीच करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जाणकार होणे गरजेचे आहे, असे काब्राल म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article