भारताचीही परिस्थिती पाकिस्तान, बांगलादेशसारखी होऊ शकते
गोवा विद्यापीठातील कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा इशारा
पणजी : भारत ही लोकशाहीची जननी आहे. येथे प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आणि हक्कांसाठी लढण्याचे स्वातंत्र्य आहे. हे खरे असले तरी प्रत्येकाने आपली मूलभूत कर्तव्ये समजून घेतली पाहिजेत. अन्यथा भारताचीही परिस्थिती पाकिस्तान आणि बांगलादेशसारखी होऊ शकते, अशी भीती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ‘समान नागरी कायदा’ आणि ‘एक देश, एक निवडणूक’ यांची कार्यवाही होण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. घटनेच्या 75 व्या वर्षानिमित्त मंगळवारी गोवा विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मणिपूर उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम पाकिस्तानची निर्मिती झाली व कालांतराने बांगलादेशाचीही निर्मिती झाली. मात्र त्या दोन्ही देशांमध्ये आज अराजकतेचे वातावरण आहे. भारतात तशी परिस्थिती नाही, कारण येथे आम्ही लोकशाहीचे पालन करतो. त्यामुळे येथे लोकशाही चालते, असे सांगितले. गोवा हे सर्वच बाबतीत आदर्श राज्य आहे. ‘समान नागरी कायदा’ देशात सर्वप्रथम गोव्यात लागू झाला. येथील प्रत्येक नागरिक हा सर्वधर्मसमभाव जपणारा आहे. आपल्या या गुणांची सर्वत्र प्रशंसा होते. अशावेळी प्रत्येकाने संविधानात नमूद केलेल्या कर्तव्यांचे पालन करावे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे सरली तरी आजही पुरूष-महिला असा लिंगभेद जागृत आहे. हा लिंगभेद संपवून समानता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी 33 टक्के राखीवतेचे विधेयक आणले. त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी डिजीटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वच्छता अभियान यासारख्या मोहिमा राबविल्या.
अशावेळी विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे योगदान महत्त्वाचे आहे. याकामी युवकांची भूमिकाही महत्वाची आहे. प्रत्येक युवकाने योगदान दिल्यास भारताला ‘विकसित भारत’ म्हणून पुढे येण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मृदुल यांनीही यावेळी विचार मांडले. समुद्रकिनारे ही गोव्याची खरी ओळख आहे. हे किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे ते म्हणाले. हल्लीच्या वर्षात किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तयार होत असल्याचे दिसून येत आहे. दररोज तयार होणारे हे प्लास्टिक गोळा करून संबंधित अधिकारीणींकडे जमा केल्यास तो एक स्तुत्य उपक्रम ठरेल, असे ते म्हणाले. अशावेळी सार्वजनिक आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वच्छतेबाबत खास कायदा बनविल्यास ते अधिक फायद्याचे ठरेल, असेही मृदूल यांनी सांगितले.