कुबेराचे धन...
इंद्राच्या दरबारात सगळ्यात मोठा मान शंकर, ब्रह्मा, विष्णू यांना होताच. इतर देवदेवतांनाही त्यांच्या दर्जाप्रमाणे मानसन्मान दिले जायचे. अनेक ऋषीमुनी देखील अनेक सन्मानाने तिथे सन्मानित व्हायचे. परंतु प्रत्येकाचा कमी जास्त दर्जा हा ठरलेला होताच. या सगळ्यांमध्ये इंद्राच्या शेजारची खुर्ची मात्र एका व्यक्तीसाठी रिकामी सोडलेली असायची. ते आल्यानंतर स्वत: इंद्र देखील उठून उभे राहायचे व त्यांना आपल्या शेजारी बसवून घ्यायचे. ते होते स्वर्गाचे खजिनदार कुबेर. या कुबेराकडे जगातल्या सगळ्यांपेक्षा जास्त संपत्ती होती. हेच कुबेर, देवांना देखील काही कमतरता भासली तर भरभरून धन देत असत, त्याच्याकडचं धन चांगल्या कामासाठी वापरलं, दुसऱ्यांसाठी वापरलं तर ते दान दुप्पट होत असे, हे सगळ्यांनाच माहिती असल्यामुळे अशाच कामांसाठी कुबेराकडून धन घेण्याची पद्धत होती. या धनासाठी अनेक राजांनी स्वर्गावरती हल्ला केला, चढाई केली, असे आपण अनेक कथांमध्ये ऐकतोच पण कुबेर कधीही कुणाच्या पुढे हरले नाहीत. कारण ते सततच दुसऱ्याला काही ना काही तरी देत असायचे. कुबेर म्हणजे सगळ्या देवांची जागतिक बँक. पण या कुबेराच्या घरचे धन एक दिवस आपण पळवायचं असा एक दुष्ट विचार एका राक्षसाच्या मनात आला. त्यांनी एक दिवस आपलं रूप बदलून कुबेराच्या घरी नोकर म्हणून तो कामाला लागला. आता त्याचं काम बघून कुबेराच्या पत्नीला फार छान वाटलं. सांगितलेलं काम क्षणात संपवणारा हा नोकर तिला अगदी जवळचा वाटायचा. एक दिवस कुबेराच्या पत्नीने आपलं अंतपुर म्हणजेच खास महाल आवरायचं ठरवलं. महाल आवरायचा, झाडायचा म्हणजे तिथल्या वस्तू हलवायला हव्या. या सगळ्या वस्तू हलवायचं काम तिनं ह्या दुष्ट राक्षसाला दिले. ती त्याला एक एक पेटी काढून द्यायची. एक एक वस्तू द्यायची आणि बाहेरच्या खोलीत नेऊन ठेवा, असे सांगायची. खोलीमध्ये नको असलेल्या जास्तीच्या अडगळीच्या गोष्टी त्याला बाहेर नेऊन टाकायला सांगायची. असं करता करता एक भली मोठी पेटी या नोकराला दिली आणि सांगितलं याच्यामध्ये फार अनमोल रत्ने आहेत. ती जपून ठेवा. राक्षसाला आता मनोमन आनंद झाला होता. त्याला जी गोष्ट हवी होती ती आपसूकच मिळाली होती. त्यांनी ती पेटी घेतली आणि केर टाकायच्या बाजूला ती नेऊन टाकली. आता संध्याकाळ व्हायला आल्यामुळे राणीने सगळ्या नोकरांना सुट्टी दिली. राहिलेलं काम उद्या करू, आता काम झाल्यानंतर हा नोकर बाहेर आला आणि बाहेर ठेवलेला कचरा आपल्या बैलगाडीत भरून लांब दूरवर नेऊन टाकायला निघाला. हे सगळं करत असताना त्याने ती पेटी अलगद ठेवली आणि तो निघाला. पुढे जाताना एका झाडाखाली थांबून त्याला या पेटीमध्ये नेमकी किती रत्ने आहेत हे बघायचं होतं पण तेवढ्यात समोरून कोणाचातरी रथ त्याला दिसला. कोणी आपल्याला बघेल त्यापेक्षा आपण आपली बैलगाडी बाजूला घ्यावी म्हणून त्यांनी घाईघाईने बैलगाडी बाजूला घेतली. पण हे करताना त्याच्या लक्षातच आलं नाही की त्या बाजूला एक भला मोठा दगड आहे. त्याच्यावर बैलगाडीचं चाक गेल्यामुळे ते उंच झालं आणि बैलगाडीचा तोल गेला. इकडून तो येणारा रथ होता तो दुसऱ्या दिशेने निघून गेल्यानंतर त्याने मागे पाहिलं. परंतु बैलगाडीचा भाग जो उंच झाला होता. त्यामुळे बैलगाडीतल्या बऱ्याचशा गोष्टी खाली घरंगळून पडल्या होत्या. त्याच्यामध्ये ती पेटी देखील होती. त्यांनी भराभरा बैलगाडी एका बाजूला घेतली, बैल झाडाला बांधले आणि तो शोधू लागला कुठे काय पडलं ते. पण जसजसं तो बघायला लागला तसं लक्षात आलं की ती पेटी जोरात खाली आदळली आणि झाकण उघडून त्याच्यातील सगळी रत्ने कुठेतरी पडली. रत्न शोधायला जायचं पण प्रखर सूर्यप्रकाश असल्यामुळे त्याला नेमकी रत्ने काही दिसेनात. तो अगदी हताश झाला, रडायला लागला आणि स्वत:लाच दोष देऊ लागला. त्याला मिळालेली रत्नांची पेटी संपूर्ण आकाशभर विखरून पडलेली होती. त्याची रत्ने आता लांबून चमकत होती. त्याला आता खूप पश्चाताप झाला. इकडे कुबेर आल्यानंतर त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला आणि ते गालातल्या गालात हसले. कुबेराचं धन कधीच चोरीला जात नसतं. कारण ते वाईट कामासाठी तर कधीच नसतं.