केएसआरटीसीला 9 श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार
बेंगळूर : भारतीय जनसंपर्क परिषदेने आयोजित केलेल्या 15 व्या जागतिक संप्रेषण परिषद आणि उत्कृष्टता पुरस्कार 2025 मध्ये कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाने (केएसआरटीसी) 9 श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. केएसआरटीसीने डिजिटल मीडिया इनोव्हेशन अँड हाऊस जर्नल प्रिंट (प्रादेशिक) श्रेणीमध्ये सुवर्णपदक, हेल्थकेअर कम्युनिकेशन फिल्स श्रेणीमध्ये रौप्य पदक आणि उत्कृष्ट मानव संसाधन कार्यक्रमासाठी कांस्यपदक जिंकले. ग्राहक सेवा उत्कृष्टता, बँडिंग, वेबसाईट आणि मायक्रोसाईट, कॉर्पोरेट फिल्स, मार्केटिंग मोहीम आणि अंतर्गत संप्रेषण मोहीम श्रेणींमध्ये सदर पुरस्कार प्राप्त केले आहेत, असे केएसआरटीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी जनसंपर्क कार्यात महामंडळाच्या राष्ट्रीय स्तरावर सिद्ध क्षमतेचा दाखला ही कामगिरी आहे. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, अभिनेत्री आणि गायिका एस्टर व्हॅलेरी नोरोन्हा, अभिनेता आणि मॉडेल मिलिंद तेंडुलकर आणि पीआरसीआयचे अध्यक्ष एम.बी. जयराम यांनी गोव्यातील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पुरस्कार समारंभात हे पुरस्कार प्रदान केले. तुमकूर विभागीय नियंत्रक अधिकारी चंद्रशेखर, चिक्कबळ्ळापूर विभागीय नियंत्रक अधिकारी बसवराजू यांनी पुरस्कार स्वीकारला.