कारवार तालुक्यातील संकरुबाग येथे केएसआरटीसी बसला अपघात
कारवार : कारवारहून केरवळीकडे निघालेल्या केएसआरटीसी बसचा येथील हब्बुवाडा रस्त्यावर पाठीमागील एक्सल बेंड कट होऊन 50 प्रवासी सुखरुप बचावल्याची घटना ताजी असताना गुरुवारी कारवारहून अंकोलाच्या दिशेने निघालेली केएसआरटीसी बस स्कीड होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत शिरली. तथापि सुदैवाने बसमधील सुमारे 50 प्रवासी सुखरुपपणे बचावले. तथापि, बसचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संकरुबाग येथे राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वर घडली. जखमी चालकाचे नाव बडेसाब मुजावर असे आहे. या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, येथून जवळच्या सीबर्ड नाविक दल प्रकल्पातील ठेकेदाराकडे सेवा बजावणाऱ्या सुमारे 30 कामगारांना घेऊन केएसआरटीसी बस सी-बर्ड प्रकल्पाकडे निघाली होती. राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वरील संकरुबाग येथील एका अवघड वळणावर बस घसरली व रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीत उतरली. या घटनेत बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. बुधवारी रात्री कारवार तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस पडला होता. पावसामुळे बस घसरली असावी, असे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारवार बस डेपो मॅनेजर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला.