क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा
अध्याय नववा
जो भक्त स्वत:चं संपूर्ण जिवीत ईश्वराला अर्पण करून अत्यंत समाधानी वृत्तीने जीवन जगत असतो त्याचे सुखदु:ख, रागलोभ आदि विकार नाहीसे होतात. निर्विकार झाल्याने तो क्षेत्रक्षेत्रज्ञविचार जाणून असतो. ज्याला मी कर्ता नाही ही स्पष्ट जाणीव झालेली असते, त्यालाच क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार पटतात. कारण तो तशी अनुभूती घेत असतो. क्षेत्र म्हणजे आपलं शरीर होय. त्यातील सर्व घटक चेतनेमुळे कार्यरत होतात. त्याबाबत आपण सविस्तर समजून घेतलं आहेच. आता पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, मी सर्वांचं मन जाणणारा असल्याने क्षेत्राला जाणतो म्हणून क्षेत्रज्ञ मीच आहे.
तज्ञं त्वं विद्धि मां भूप सर्वान्तर्यामिणं विभुम् ।
अयं समूहोऽ हं चापि यज्ञानविषयौ नृप ।। 23 ।।
अर्थ-हे भूपा, हा समूह आणि मी देखील ज्याच्या ज्ञानाचे विषय झालो आहो असा सर्वान्तर्यामी सर्वव्यापी असा ज्ञात-क्षेत्रज्ञ मीच आहे असे जाण.
विवरण-आपण पूर्वी बघितलेली भक्तलक्षणे ज्याच्या स्वभावाचा भाग झालेली आहेत असा मनुष्य निर्विकारी असतो. ज्याचे सुखदु:खादी विकार संपलेले आहेत तो राग लोभ इत्यादी भावनारहीत होऊन निर्विकार झालेला असतो. असा निर्विकारी मनुष्य क्षेत्रक्षेत्रज्ञविचार विचार जाणतो. त्यापैकी क्षेत्र म्हणजे आपलं शरीर हे आपल्याला माहीत आहे. आता या श्लोकात क्षेत्रज्ञ मीच आहे असं बाप्पा सांगत आहेत. निर्विकारी मनुष्य, स्वत:च्या शरीराला, त्याच्या मर्यादाना व ईश्वराच्या अमर्याद शक्तीचा जाणकार असतो.
ईश्वराचा अंश जिवात्म्याच्या रूपाने सर्व शरीरात वास करत असतो आणि त्या त्या शरीराचा कार्यकाल पूर्ण झाला की, दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. प्रत्येक जन्मात तोच आत्मा नवे शरीर धारण करून व्यक्त रूपात येत असतो आणि पूर्णतेनंतर ईश्वरात विलीन होतो. म्हणून क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा असं म्हणता येईल. हा सर्व क्षेत्रांचे संगोपन करत असतो. अशा या ईश्वराला जाणून घेणे हे प्रत्येक मनुष्याचे ध्येय असायला हवे. पूर्वीच्या ऋषीमुनींनी वेद आणि उपनिषदातून क्षेत्र व क्षेत्रज्ञ याविषयीचे विचार सविस्तर मांडलेले आहेत. हे ज्ञान अत्यंत पवित्र व परमोच्च असून जीवाला तृप्ती, पूर्णता देते. म्हणून ऋषीमुनींनी या ज्ञानाची स्तुती केलेली असून महात्म्य सांगितलेलं आहे. हे ज्ञान संपादन करण्यासाठी कोणती लक्षणे आवश्यक आहेत हे पुढील श्लोकातून बाप्पा सांगत आहेत.
आर्जवं गुरुशुश्रूषा विरक्तिश्चेन्द्रियार्थतऽ ।
शौचं क्षान्तिरदम्भश्च जन्मादिदोषवीक्षणम् ।। 24।।
समदृष्टिर्दृढा भक्तिरेकान्तित्वं शमो दमऽ ।
एतैर्यच्च युतं ज्ञानं तज्ञानं विद्धि बाहुज ।। 25 ।।
अर्थ- हे क्षत्रिया, सरलता, गुरूपासून ज्ञान श्रवण करण्याची इच्छा, इंद्रियांच्या विषयांपासून विरक्ति, शौच, शान्ति, दंभाचा अभाव, जन्म व मृत्यु हे दोष आहेत असे जाणणे, समान दृष्टि, दृढ भक्ति, एकान्तवास, शम, दम यांनी युक्त जे ज्ञान ते खरे ज्ञान असे जाण.
विवरण- सर्वत्र एकच ईश्वर भरून राहिला आहे आणि सामोरे येणारा प्रत्येक प्राणिमात्र हा ईश्वराचंच रूप आहे ह्याची ठाम खात्री आत्मज्ञानी व्यक्ती बाळगून असते. साहजिकच त्याच्या वागण्याबोलण्यामध्ये त्याचे प्रतिबिंब उमटते आणि विशेष म्हणजे ह्यासाठी त्याला वेगळा काही खटाटोप करावा लागत नाही. अशी व्यक्ती निष्कपट असते, तिला गुरुजनांविषयी आदर व विश्वास असतो, गुरुसेवेप्रति विशेष आवड असते, विषयांविषयी वैराग्य, अंतर्बाह्य शुद्धता, क्षमाशील वृत्ती, समवृत्ती, अदांभिकता, जन्म, मृत्यू, जरा व्याधी ही दु:खास कारणीभूत होतात हे ओळखून राहणे इत्यादि गुण तो बाळगून असतो.
क्रमश: