रशियाची कॅसेटकिना विजेती
वृत्तसंस्था/ बिजिंग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या निंगबो खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या डेरिया कॅसेटकिनाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना आपल्याच देशाच्या मीरा अँड्रीव्हाचा पराभव केला.
एकेरीच्या अंतिम सामन्यात कॅसेटकिनाने अँड्रीव्हाचा 6-0, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. 2024 च्या टेनिस हंगामातील कॅसेटकिनाचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी तिने ईस्टबोर्न टेनिस स्पर्धा जिंकली होती. चालू वर्षीच्या टेनिस हंगामामध्ये तिने चार स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. रविवारच्या अंतिम सामन्यात कॅसेटकिनाने पहिला सेट 6-0 असा एकतर्फी जिंकल्यानंतर अँड्रीव्हाने दुसऱ्या सेटमध्ये मुसंडी मारत हा सेट 6-4 असा जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये कॅसेटकिनाने वेगवान अचूक सर्व्हिस व बेसलाईन खेळाच्या जोरावर अँड्रीव्हाचे आव्हान 6-4 असे संपुष्टात आणत अजिंक्यपद मिळविले.