KrushikApp : शेतकऱ्यांनो खतांची माहिती देणार 'कृषिक अॅप', कसं वापरायचं माहितीये? वाचा सविस्तर..
माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक शास्त्रीय आणि फायदेशीर होईल
कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांसाठी एक नवी डिजिटल सुविधा उपलब्ध झाली आहे. 'कृषिक' हे अॅप शेतकऱ्यांना विविध खतांची माहिती, त्यांच्या उपलब्धतेचा साठा, तसेच पिकानुसार योग्य खतांची निवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन करते. या अॅपचा वापर करून शेतकरी घरबसल्या खते कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती पाहू शकतात.
प्रत्येक खत विक्रेत्याचे नाव, त्याचा मोबाईल नंबर आणि उपलब्ध खतांची यादी यासह अॅपमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. कृषी क्षेत्राला डिजिटल दिशेने नेणारे हे अॅप शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह साथीदार ठरत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक शास्त्रीय आणि फायदेशीर होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये :
खतांचा साठा: विक्रेत्यांकडे उपलब्ध खतांची माहिती अपडेट स्वरूपात
पिकानिहाय खतांचे मार्गदर्शनः कोणत्या पिकासाठी कोणते खते, किती प्रमाणात वापरावेत याचे स्पष्ट निर्देश
विक्रेत्यांची यादीः दुकानाचे नाव, मोबाईल क्रमांक, उपलब्ध खते
बाजारभावः शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनांचा साप्ताहिक दर
कृषी योजनाः सरकारी योजनांची अद्ययावत माहिती
प्रशिक्षणः कृषी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कार्यशाळांची माहिती
प्ले स्टोअरवरुन सहजरित्या करता येणार डाऊनलोड
प्ले स्टोअरवर अॅपचे नाव टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये आपली माहिती टाकून हे अॅप आपल्याला चालू करता येते. जर आपल्याला खताविषयी माहिती हवी असेल तर जिल्हा, तालुका निवडून विक्रेत्यांची यादी येते. त्यातून आपल्याला खतांविषयीची माहिती मिळते. तसेच पिक लावण करताना हवामानाची अचूक माहितीही आपल्याला या अॅपमधून मिळणार आहे.
या अॅपमध्ये इतरही काही पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत त्यामध्ये कृषी वार्ता, पशु सल्ला, डेअरी, कृषी सल्ला, बाजारभाव, कृषी गणकयंत्र, तज्ज्ञ, उत्पादने, अभिप्राय शंका, कृषिक प्लस, कृषी प्लस, कृषी योजना, पीक मार्गदर्शक अशा विविध सुविधा या अॅपच्या कृषिक खत माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार
या अॅपच्या माध्यमातून विक्रेते मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करत फसवणुकीला सामोरे जायला लागते. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबणार आहे.