महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

थाळीफेकमध्ये क्रिस्टनची स्टॅहलवर मात

07:00 AM Jul 21, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप : ऑस्ट्रेलियाची इलीनोर पॅटरसन, ब्रिटनचा जेक वाइटमनही सुवर्णपदकाचे मानकरी

Advertisement

वृत्तसंस्था /युजीन, अमेरिका

Advertisement

स्लोव्हेनियाचा युवा ऍथलीट क्रिस्टन सेहने आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन करीत वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या थाळीफेकमध्ये स्वीडनच्या डॅनियल स्टॅहलची मक्तेदारी संपुष्टात आणत मेजर चॅम्पियनशिपमधील पहिले सुवर्णपदक पटकावले. याशिवाय इलीनोर पॅटरसनने महिलांच्या उंच उडीचे व ब्रिटनच्या जेक वाइटमनने पुरुषांच्या 1500 मी. शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले.

ऑलिम्पिक चॅम्पियन व 2019 मध्ये या स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱया स्टॅहलने पहिल्या फेरीत 66.59 मी. अंतर थाळीफेक करीत काही वेळ आघाडी घेतली होती. पण लिथुआनियाच्या ऍलेन्का व ऍन्ड्रियस गुडझियस यांनी पाचव्या प्रयत्नात 67.10 मी. फेक करीत त्याला मागे टाकले. त्यानंतर स्टॅहलला पुन्हा पदकाच्या शर्यतीत येण्याइतकी कामगिरी करता आली नाही. 23 वर्षीय क्रिस्टन सेहने तिसऱया प्रयत्नात 71.13 मी. थाळीफेक करीत स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकही निश्चित केले.

‘मोठा थ्रो करण्याची माझ्यात क्षमता असल्याची मला जाणीव होती. पण माझे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पहिलेच मोठे यश असून सुरुवातीपासूनच माझ्या मनात विविध भावना निर्माण झाल्या होत्या,’ असे सेह नंतर म्हणाला. आता पुढील महिन्यात होणाऱया युरोपियन चॅम्पियनशिपकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचेही तो म्हणाला.

ऍलेन्का व गुडझियस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. त्यांनी चौथ्या प्रयत्नात अनुक्रमे 69.27 व 67.55 मीटर्स थाळीफेक करीत सर्वोत्तम कामगिरी केली. आपल्या देशाला दोन पदके मिळाली, याचा मला खूप आनंद वाटतो, असे 19 वर्षीय ऍलेन्का म्हणाला. गुडझियसने 2017 मधील स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.

पॅटरसनचा ऑस्ट्रेलियन विक्रम

महिलांच्या उंच उडीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या इलीनोर पॅटरसनने सुवर्णपदक पटकावले. तिने 2.02 मी. उंच उडी घेत नवा ऑस्ट्रेलियन विक्रम नोंदवत येथे पहिले स्थान मिळविले. यावर्षीच्या वर्ल्ड इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या युक्रेनच्या यारोस्लाव्हा महुचिखने रौप्यपदक पटकावले. पॅटरसन व यारोस्लाव्हा यांच्यात जोरदार चुरस लागली होती. इटलीच्या इलेना व्हॅलोर्टिगाराने 2.00 मी. उंच उडी घेत कांस्यपदक मिळविले. युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली असल्याने तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन स्वतःकडेच राखलेल्या रशियाच्या मारिया लसित्स्केनेला या स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे तिला यावेळी जेतेपद स्वतःकडे राखता आले नाही. गेल्या वर्षी तिने ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक मिळविले होते.

वाइटमनची जेकबर मात

ब्रिटनच्या जेक वाइटमनने ऑलिम्पिक चॅम्पियन नॉर्वेच्या जेकब इन्गेब्राइटसेनला मागे टाकत रोमांचक ठरलेल्या पुरुषांच्या 1500 मी. शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. जेकबने या शर्यतीच्या अंतिम लॅपवेळी आघाडी घेतली होती. पण वाइटमनने शेवटच्या 200 मी.मध्ये वेग वाढवत बाजी मारली. वाइटमनने 3 मिनिटे 29.23 सेकंदात शर्यत पूर्ण केली. जेकबने 3ः29.47 मि. वेळ नोंदवत रौप्य व स्पेनच्या मोहमद कतिरने 3ः29.90 मि. वेळ घेत कांस्यपदक मिळविले.

या शर्यतीत केनियाच्या ऍबेल किपसंगने प्रारंभी आघाडी घेतली होती तर जेकब पाचव्या स्थानावर होता. शेवटच्या दोन लॅप्स असताना जेकबने किपसंग व विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन तिमोथी चेरूयट यांना मागे टाकले. शेवटच्या लॅपमध्ये जेकब, केनियाचे दोन धावपटू व ब्रिटनच्या जोश केर व वाइटमन यांच्यातच चुरस लागली. त्यात वाइटमनने जेकबवर मात करीत यश मिळविले. विशेष म्हणजे वाइटमनचे वडील जेफ यावेळी शर्यतीचे समालोचन करीत होते. मुलाने सुवर्ण मिळविल्यानंतर ते भावनावश झाले आणि माझा मुलगा वर्ल्ड चॅम्पियन बनला, असे त्यांनी साऱया स्टेडियमला जल्लोष करीत सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article