महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीकृष्णाचे देहात असणे हे ते एक नाटकच होते

06:30 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

श्रीकृष्णनाथांच्या महानिर्वाण प्रसंगाचे वर्णन श्री नाथमहाराज करत आहेत. ते म्हणाले, स्वलीलेने भगवंतांनी अवतार घेतला आणि चैतन्यपूर्ण असलेले श्रीकृष्ण सगुण रुपात अवतरले. ह्या अवतारात त्यांनी स्वत:च्या सामर्थ्याने दावाग्निचे सेवन केले, त्यांनी कालियाचे विष पचवल्यामुळे ते त्यांच्या अंगात भिनू शकले नाही. अर्थात हे सर्व त्यांना शक्य झाले कारण ते देहात आहेत असे वाटत असले तरी ते विदेहीच होते. त्यांचे देहात असणे हे ते एक नाटकच होते. प्रत्यक्षात देहच धारण केलेला नसल्याने त्यांना मरण कशाचे येणार? भक्तीने प्रसन्न होणारे श्रीकृष्ण भक्ताच्या हृदयात आपणहून प्रकटतात आणि ज्या भक्ताच्या बाबतीत हे घडतं तोही त्यांच्याप्रमाणेच देही असून विदेही होतो. दुसऱ्याला देहात असून विदेही अवस्था प्राप्त करून देण्याइतकी ताकद ज्यांच्या अस्तित्वात असते. त्यांच्या ठिकाणी देहत्व असेलच कसे? त्यामुळे श्रीकृष्णांचा नाश झालाच नाही. त्यांचा देह नाहीसा झाला हा केवळ आभास होय. ज्याप्रमाणे आरशासमोरून माणूस हलला की, त्याचे त्यात दिसणारे प्रतिबिंब नाहीसे होते. तरीपण प्रत्यक्षात त्या माणसाचे अस्तित्व असतेच. त्याप्रमाणे कृष्णदेह नाहीसा झाला असे वाटत असल्याने तो समोर दिसला नाही तरी अन्यत्र तो कोठेतरी हजर असतोच.

Advertisement

असं निश्चयाने म्हणायचे कारण म्हणजे, त्याचे नाम जो तल्लीन होऊन घेईल त्याच्या जन्ममरणाचे निरसन होते मग जर कृष्ण निधन पावला हे गृहीत धरलं तर मग भक्तांचा उद्धार कोण करणार? स्वत:च्या आत्ममायेने श्रीकृष्णनाथाने सगुण रूप घेतले आणि अवतारकार्य पूर्ण झाल्यावर त्या मायेचाच जर त्याग त्यांनी केला तर ते निजरुपात स्थिर झाले असे फारतर म्हणता येईल. कृष्णाचा देह ना कुणी नेला, ना त्यांनी त्याचा त्याग केला म्हणजेच त्या देहाचा त्यांनी लीलेने संकोच केला आणि ते निजधामाला गेले असा त्याचा अर्थ होतो. संकोच अशासाठी म्हणायचं की, भक्ताने जर त्यांचे ध्यान केले तर संकोच केलेल्या रूपातून सगुण साकार रुपात ते प्रकट होतात. भक्ताचा जसा भाव असतो त्याप्रमाणे भगवंतांचा देह प्रकट होतो ह्याचं कारण असं की, भक्ताने जणू ते समोर उभे आहेत अशी कल्पना करून त्यांच्या संपूर्ण देहाचे ध्यान केलेले असते. त्यामुळे त्यांना जसेच्यातसे प्रकट व्हावे लागते मग कृष्ण सदेह निजधामाला गेले म्हणण्यात काहीच अर्थ रहात नाही. म्हणून कृष्णमूर्ती जरी सगुण असली तरी त्यांच्या देहाचे दहन झाले असे कधीच होत नाही. त्यांच्या देहाचे दहन झाले असे समजले किंवा त्यावर दृढ विश्वास ठेवला तर त्यांच्या देहाच्या दहनाबरोबर सर्व जगाचे दहन व्हायला पाहिजे कारण कृष्णाच्या आश्रयाने संपूर्ण जग चालले आहे. मायेवर हुकुमत चालत असल्यामुळे ज्यांनी स्वत:च्या पोटातील अखिल ब्रह्मांडाचे दर्शन तोंड उघडून यशोदेला दाखवले त्या श्रीकृष्णांचा देह जर दहन केला तर त्याबरोबर ब्रह्मांडाचे दहन केल्यासारखे झाले असते कारण हे ब्रह्मांड त्यांच्यातच सामावलेले आहे. तेव्हा श्रीकृष्णांचे असणे, जाणे हे केवळ त्यांचे त्यांना माहित! ह्याबाबत वेदांचेही बोलणे खुंटले असल्यामुळे तेही काही सांगू शकत नाहीत. ही श्रीकृष्णांची अगम्य गती महादेव आणि ब्रह्मदेवांच्या मतीच्या पलीकडची असल्याने त्यांनाही असेच वाटत होते की, श्रीकृष्ण आपल्याबरोबर येतील. अर्थातच ह्या कल्पनेने समस्त देवगणांनी आनंद व्यक्त केला. आता पुढे काय काय होणार आहे ते पाहायला ते अगदी सावध होऊन बसले. भगवंतांच्या स्वागतासाठी निरनिराळ्या देवांची दिव्य वाद्ये वाजू लागली. पुन्हा एकदा दिव्य फुलांचा वर्षाव श्रीकृष्णनाथांच्यावर होऊ लागला. भगवंत पुन्हा परत येणार ह्याचा त्यांना विशेष आनंद झाला होता अर्थात त्याला तसे सबळ कारण होतेच.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article