कृष्णा मैली हो गई...
सातारा :
सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे असून सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातून ती पुढे कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करते. सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पात्रात संगममाहुली येथे बऱ्याच प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. नदी पात्रात अनेक ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्याच्याही तक्रारी वारंवार झाल्या आहेत. नुकताच नदी प्रदुषणाचा मुद्दा मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातल्या भाषणात उपस्थित झाला. त्यांच्या भाषणात कृष्णा नदीचाही उल्लेख आला होता. संगममाहुली येथे कृष्णा नदीच्या पात्रात होत असलेल्या कचऱ्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासनाच्या अक्षरशः डुलक्याच लागलेल्या दिसतात.
सातारा जिल्ह्यात ज्या नद्या प्रवाहित आहेत त्यामध्ये कृष्णा नदी प्रमुख आहे. त्या नदीच्या पात्रात अगदी धोम धरणाच्या पायथ्यापासून ते जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत जलपर्णी व कचऱ्याची समस्या पहायला मिळते. धोम या गावात तर वारंवार जलपर्णी काढण्याचे प्रयोग झाले. वाई येथे दर रविवारी सामजिक संघटनांकडून नदी संवर्धनाचे काम केले जाते. मात्र, साताऱ्याच्या संगममाहुलीच्या कृष्णा नदी तिरावर वेगळीच परिस्थिती आहे. आठवड्यातून दोन दिवस विधीनिमित्ताने गर्दी होत असते. विधीला येणारे नातेवाईक, पुरोहित हे पुजेचे साहित्य, हार फुले, देव्हारे घेवून येतात. ते सगळे तसेच पूजा झाल्यानंतर टाकून जातात. त्यामुळे नदीच्या पात्रालगत अक्षरशः उर्किंडाच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतेच मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांच्या भाषणात नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्याच अनुषंगाने सातारा तालुक्यातील संगममाहुली येथील चित्र पाहिले तर भयान असे आहे. नदी काठावर वळवा असल्याचा जसा काही मंडळींनी शोध लावला परंतु या नदी पात्राच्या स्वच्छतेकरता काही उपाय शोधले गेले नाहीत, याचीच चिंता सातारकर व्यक्त करत आहेत.
- संगममाहुली ग्रामपंचायतीचा संबंध येत नाही
याबाबत ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश माने यांच्याशी विचारणा केली असता होणाऱ्या कचऱ्याचा आमच्या ग्रामपंचायतीशी कसलाही संबंध येत नाही. जे लोक विधी करायला येतात ते बाहेरचे असतात, असे त्यांनी सांगितले.
- नदी पात्राच्या संवर्धनासाठी प्रशासनाने लक्ष घालावे
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने कृष्णा नदी ही महत्वाची नदी पाहिली जाते. याच नदीची अवस्था बिकट असून केंद्र आणि राज्य सरकारने नदी पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. केवळ निधीची तरतुद करुन उपयोग नाही तर ठोस उपाय हवा आहे. त्याची अंमलबजावणी हवी आहे.
सागर भिसे जनपरिवर्तन युवा शक्ती अध्यक्ष
- तेथे जाणाऱ्या प्रत्येकाचीही जबाबदारी आहे
संगममाहुली म्हणजेच दक्षिण काशी. त्याच दक्षिण काशीच्या ठिकाणी विधीनिमित्ताने जी मंडळी जातात. त्यांनी जे साहित्य नेले जाते ते पाण्यात न टाकता ते प्लास्टिकच्या पिशव्या व इतर साहित्य हे तेथे कुंड असतील तर त्या ठिकाणी एकत्रीत ठेवावित. त्यात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करावी.
जितेंद्र वाडकर सामजिक कार्यकर्ते