कोयनेचे दरवाजे 13 फुटांवर कायम
नवारस्ता :
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोयना पाणलोट क्षेत्रात अक्षरश: हाहाकार केला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात प्रतिसेकंद 1 लाख 11 हजार 166 क्युसेक पाण्याची आवक सुरु झाल्याने पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा कोयना धरणाचे 13 फूट उचलण्यात आलेले सहा वक्र दरवाजे बुधवारीही कायम ठेवण्यात आले.
परिणामी कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 95 हजार 300 क्युसेक्स विसर्ग सलग दुसऱ्या दिवशीही कायम ठेवण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
दरम्यान कोयना नदीच्या महापुरात पाण्याखाली गेलेले नेरळे, मुळगाव, निसरे हे महत्वपूर्ण तीन पूल दुसऱ्या दिवशीही पाण्याखालीच राहिले. जिल्ह्यात घाटक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अन्य ठिकाणी पावसाचा जोर मंदावला आहे. पूरस्थिती मात्र कायम आहे.
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने मंगळवारी 100 टीएमसीचा टप्पा पार केल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीची निर्धारित पातळी ठेवण्यासाठी सोमवारपासून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रासाहित संपूर्ण पाटण तालुक्यात संततधार पावसाचा जोर वाढतच राहिल्याने मंगळवारी रात्री 13 फुटांवर उचलण्यात आलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे बुधवारीही स्थिर ठेवण्यात आले. परिणामी धरणातून कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आलेला 95 हजार 300 क्यूसेक्स बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम ठेवण्यात आला.

दरम्यान मुसळधार पाऊस आणि विसर्ग यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कोयना आणि कृष्णा नदीला महापुराचे स्वरूप निर्माण झाले आहे. कोयना नदीवरील पाटण शहराशी जोडणारा नेरळे पूल, मूळगाव पूल, संगमनगर धक्का जुना पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेल्या चोवीस तासांपासून गेले आहेत, ते अद्याप कायम आहेत. प्रशासनाने कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी केला आहे.
बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 33 (3961) मिलिमीटर, नवजा येथे 44 (4866) मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 53 (4561) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात प्रतिसेकंद 1 लाख 11 हजार 166 क्युसेक इतक्या प्रचंड पाण्याची आवक सुरु होती. धरणाची पाणीपातळी 2160.07 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 101.46 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात बुधवारी सायंकाळनंतरही पावसाचा जोर कायम होता.
- पालकमंत्र्यांनी केले कोयना धरणाचे जलपूजन
कोयना जलाशयामध्ये 101.46 पाणीसाठा असताना बुधवारी सायंकाळी कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपूजन राज्याचे पर्यटन तथा जिह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सावळाराम लाड, अशोकराव पाटील, गजानन कदम, पांडुरंग नलवडे, विजय पवार, बशीर खोंदू, सुरेश पानस्कर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सीईओ याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय अधिकारी सोपान टोमपे, तहसीलदार अनंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री शंभूराज देसाई प्रतिक्रिया देताना म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपल्या कोयनामाईकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो.
विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर या भागाचा तसेच शेजारच्या कर्नाटक व आंधप्रदेश या दोन राज्यांतील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोयना धरणामुळे मोठया प्रमाणांत सुटतो. हे धरण लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कल्पनेने त्यांच्या प्रेरणेने पूर्ण झाले. महाराष्ट्रावरती पिण्याच्या, शेतीच्या व औद्योगिकीकरणाच्या पाण्यासाठी लागणारी जी तहान आहे, ती कोयनामाईने अशाचप्रकारे पूर्ण करावी. कोयना धरणामुळे जी हरीत क्रांती झालेली आहे, त्याची अशीच भरभराटी व्हावी.
- पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण, हेळवाक येथे पाहणी केली. तर पाटणच्या ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ही बुधवारी सकाळी पाटण तालुक्यातील कोयना नदीकाठच्या नावडी, मंद्रळ हवेली, पाटण, हेळवाक आदी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्या सहित नागरिक उपस्थित होते.
- धरणांचा विसर्ग सुरूच
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने व धरणात पाण्याची आवक सुरूच आल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा विसर्ग कायम आहे. कोयना धरणातून 95 हजार 300 क्युसेक, धोम धरणातून 7 हजार 372 क्युसेक, धोम बलकवडीमधून 2 हजार 616 क्युसेक, कण्हेरमधून 5 हजार 159 क्युसेक, उरमोडीमधून 4 हजार 367 क्युसेक, तारळी धरणातून 3 हजार 28 क्युसेक, वीर धरणातून 55 हजार 411 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.