koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे आठ दिवसानंतर बंद ; सिंचन विभागाची माहिती
नवजा येथे पावसाने सहा हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला
नवारस्ता : हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून उघडण्यात आलेले कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे शनिवारी सकाळी बंद करण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोयना पाणलोट शनिवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अगोदरच काठोकाठ भरलेल्या कोयना धरणात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ सुरू झाली आहे.
परिणामी धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवार २७ पासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटापर्यंत उघडून कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी होत गेल्याने दरवाजे कमी कमी करण्यात आले. अखेर शनिवारी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरल्याने सकाळी आठ वाजता धरणाचे सर्व सहा दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती सिंचन विभागाने दिली.
नवजा येथे पावसाने सहा हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला
जून महिन्यापासून आज अखेर कोयनानगर येथे एकूण चार हजार ७४८ मिलिमीटर, नवजा येथे सहा हजार एक मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे पाच हजार ७३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोयना धरणात सध्या १०४.०६ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणात प्रतिसेकंद चार हजार १९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्यामधून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.