Kolhapur News : कोतोली प. माळवाडीमध्ये गोठ्याला भीषण आग...!
कोतोलीत भीषण आग
पन्हाळा : कोतोली पैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथील महादेव भाऊ चौगले यांच्या घराशेजारी जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. ही घटना मंगळवारी रात्री घडली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग लागलेल्या गोठ्यातील तीन जनावरे बाहेर काढण्यात यश आले. पन्हाळा पालिकेच्या अग्निशामक जवानांनी आग आटोक्यात आणली.
कोतोलीपैकी माळवाडी येथील बुवाचीवाडी येथे महादेव चौगले यांचे घर आहे. घराशेजारीची जनावरांचा गोठा आहे. मंगळवारी रात्री गोठ्याला आग लागली. गावातील सागर चौगले, विजय सागावकर आणि शरद चौगले यांनी धाडसाने गोठ्यात शिरून तीन जनावरांना बाहेर काढले. माळावरील पिंजरामुळे अग्नीने रोद्ररूप धारण केल्याने आग आटोक्या आणणे मुश्किल झाले. माळ्यावर रचलेली वैरण, लोखंडी अँगल, सिमेंट पत्रे यासह बरेच इतर साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.