कोटियान, सुतार यांची प्रभावी गोलंदाजी
वृत्तसंस्था/बेंगळूर
तनुष कोटियान आणि मानव सुतार यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर गुरूवारपासून येथे सुरू झालेल्या चार दिवसांच्या सामन्यात द.आफ्रिका अ ने पहिल्या डावात 9 बाद 299 धावा जमविल्या. द. आफ्रिका अ संघातील जॉर्डन हर्मन आणि हमझा यांनी शतकी भागिदारी करताना वैयक्तिक अर्धशतके झळकविली. या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून द. आफ्रिका अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. कंबोजने सलामीचा फलंदाज सेनोकवेनीला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर हमझा आणि जॉर्डन हरर्मन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 132 धावांची शतकी भागिदारी केली. हमझाने 109 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 66 तर जॉर्डन हर्मनने 141 चेंडूत 8 चौकारांसह 71 धावा जमविल्या.
रुबीन हर्मनने 87 चेंडूत 6 चौकारांसह 54 तर व्हुरेनने 75 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 46 धावा जमविल्या. द. आफ्रिका अ संघाच्या डावामध्ये 28 अवांतर धावा मिळाल्या. भारत अ संघातर्फे तनुष कोटियनने 83 धावांत 4 तर मानव सुतारने 62 धावांत 2 तसेच खलील अहमद, कंबोज, ब्रार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यष्टीरक्षक पंतला यष्टीमागे स्थिर होण्यास थोडा वेळ लागला. गेल्या जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीनंतर पंतचा हा पहिलाच सामना आहे. दुखापतीमुळे या सामन्यासाठी एन. जगदीशन दुखापतीने जखमी झाल्याने त्याच्या जागी शेवटच्या क्षणी इशान किशनला संघात स्थान देण्यात आले. द. आफ्रिका अ संघाने 35 षटकात 2 बाद 138 धावा जमविल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी आपले तीन गडी केवळ 27 धावांत गमविल्याने त्यांची स्थिती 5 बाद 197 अशी झाली. रुबीन हर्मन आणि व्ह्युरेन यांनी सहाव्या गड्यासाठी 72 धावांची भर घातली.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका अ प. डाव 85.2 षटकात 9 बाद 299 (जॉर्डन हर्मन 71, हमझा 66, रुबीन हर्मन 54, व्ह्युरेन 46, अॅकरमन 18, अवांतर 28, कोटियन 4-83, मानव सुतार 2-62, खलील अहमद, अन्शुल कंबोज, ब्रार प्रत्येकी 1 बळी).