Satara News : कुमठेत दोन तरुणांवर तलवार, कोयत्याने हल्ला
जुन्या वैमनस्यातून दबंग आरोपींनी शेतात दहशत माजवली
एकंबे : कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावच्या खरटुळ शिवारात रविवारी रात्री जुन्या वैमनस्यातून दबंग आरोपींनी अक्षरशः तलवार आणि कोयते नाचवत दहशत माजवली. फिर्यादी कुणाल जाधव व त्याचा मित्र आकाश कोळी हे शेतात जात असताना आरोपींनी कारमधून त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. तलवार आणि कोयत्याने त्यांच्यावर केले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी उशिरा रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडकेमुळे रस्त्यावर पडलेल्या दोघांवर आरोपी साहील बोडरे, आशिष जाधव, करण (पूर्ण नाव माहित नाही) आणि इतर चार अनोळखी इसमांनी वेढा घालुन तलवार व कोयत्याने हल्ला चढवला. कुणाल व आकाश याच्या डोक्यावर, हातांबर, पायांवर सपासप वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. परिसरात काही क्षण दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गंभीर जखमी अवस्थेत दोघांना सातारा येथे खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले तपास करत आहेत.