कोरिया ओपन : मेघना रेड्डी मुख्य ड्रॉमध्ये
वृत्तसंस्था/ सुवोन, कोरिया
भारताची महिला बॅडमिंटनपटू मेघना रेड्डी ने येथे सुरू असलेल्या कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळविला. तिने पात्रता फेरीतील सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांवर सरळ गेम्सनी विजय मिळविले.
पात्रतेच्या पहिल्या फेरीत 21 वर्षीय मेघनाने चिनी तैपेईच्या पेइ चु चेनवर 21-6, 21-18 अशी मात केली तर दुसऱ्या सामन्यात तिने जपानच्या रिरिना हिरामोटोवर 21-19, 22-20 अशी संघर्षानंतर मात करीत मुख्या ड्रॉमधील स्थान निश्चित केले. मुख्य स्पर्धेतील पहिल्या फेरीत तिची सलामीची लढत थायलंडच्या टॉनरग सइहेंगविरुद्ध होईल.
पात्रता फेरीत अन्य सर्व भारतीय खेळाडूंना मुख्य ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले. पुरुष एकेरीत शिवांशला तैपेईच्या लु वेइ हसुआनकडून 12-21, 21-17, 12-21, दुहेरीत नितिन कुमार व हर्ष राणा यांना तैपेईच्या बाओ झिन डा गु ला व यु हसांग चौ यांच्याकडून 11-21, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत शिवांश व प्रणवे चांडेल यांनाही हुंग बिंग फु व फु स्युआन लियू यांच्याकडून 15-21, 6-21 अशी हार पत्करावी लागली.