बोली असलेली कोंकणी राजभाषा म्हणून लादली
गो. रा. ढवळीकर यांचे प्रतिपादन : माशेल मराठीप्रेमी कार्यकर्ता मेळावा
कुंभारजुवे : गोव्याची राज्यभाषा ठरविताना त्यावेळच्या राजकर्त्यांनी मोठी चूक केली आणि मराठीवर अन्याय केला. बोली असलेली कोंकणी तसेच 95 टक्के लोक ती बोलतात म्हणून ती 37 वर्षापूर्वी राज्यभाषा म्हणून आमच्यावर लादली. वास्तविक मराठी राजभाषा व्हायला हवी होती, असे प्रतिपादन मराठी राजभाषा निर्धार समिती गोवाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांनी केले. माशेल येथे मराठी राजभाषा निर्धार समिती गोवाच्या तिसवाडी प्रंखडतर्फे आयोजित मराठीप्रेमी कार्यक्रर्त्यांच्या मेळाव्यात ढवळीकर बोलत होते.
सर्व व्यवहार मराठीतून होतात
ढवळीकर पुढे म्हणाले की कित्येक शतकांपासून गोव्याचे सांस्कृतिक कार्यक्रम हे मराठीतून होतात त्याला कित्येक पुरावे उपलब्ध आहेत. सगळे धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे मराठीतूनच होतात. तरी बोली भाषा असलेल्या कोकणीला राज्यभाषा करून मराठीवर झालेला अन्याय हा आमच्या संस्कृतीवर झालेला अन्याय आहे.
तीसपैकी वीस आमदार मराठीच्या बाजूने
ज्यावेळी राजभाषा कायदा झाला त्यावेळी असलेल्या 30 आमदारापैकी 8 आमदार मगो पक्षाचे होते ते मराठीच्या बाजुने तसेच काँग्रेसचे 12 आमदार मराठीच्या बाजुने होते. म्हणजेच तीसपैकी वीस आमदारा मराठीच्या बाजुने होते.
पंचायती, नगरपालिकांचे मराठीला समर्थन
180 ग्रामपंचायतीपैकी 130 ग्रामपंचायतीनी मराठी राज्यभाषा व्हावी असा ठराव घेतले होते. 11 नगरपालिकांपैकी 8 नगरपालिकांनी मराठीच्या बाजूने ठराव घेतला होता. असे असताना मराठीवर तेव्हा अन्याय झाला होता. आता जागे व्हायची वेळ आली आहे. कारण ही चळवळ आज वृद्ध चालवितात असा अप्रचार सद्या चालू आहे. परंतु या आमच्या मेळाव्याना युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो. आमच्या संस्कृती रक्षणासाठी जर आता नाही तर कधीही नाही. त्याचसाठी आता एकत्र येऊन राजभाषेसाठी शेवटचा लढा देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मराठी राजभाषा निर्धार समिती गोवाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर मराठी राजभाषा निर्धार समिती गोवाचे निमंत्रक प्राचार्य. सुभाष वेलिंगकर, ज्येष्ठ कार्यकर्ते शाणुदास सावंत, अशोक नाईक, तिसवाडी प्रंखड समन्वयक सुरेश डिचोलकर, तिसवाडी प्रंखड अध्यक्ष हनुमंत मांजरेकर, तसेच श्रुतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे कविता फडते व मीरा पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक तिसवाडी प्रंखड अध्यक्ष हनुमंत मांजरेकर यांनी केले. माझ्यावर संस्कार हे मराठीतून झाले. तसेच राष्ट्रीय स्वाभिमानसुध्दा मला मराठीतून आला. कोंकणीतून माझ्यावर कुठलेच संस्कार झालेले नाही.
जो मराठीचा आहे, त्याला मते देणार
मराठीची ताकद आम्हाला आता राजकीयदृष्ट्या दाखवायची आहे आणि त्याचसाठी हे मेळावे ही सुऊवात आहे. सद्या 18 प्रखंडापैकी सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता फक्त दोन प्रखंडात मेळावे बाकी आहे. 2026 मध्ये दोन्ही जिह्यात होणाऱ्या किमान प्रत्येकी वीस हजारांची सभा अपेक्षित आहे. मराठीची ताकद मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी आम्ही एकजुटीने झटले पाहिजे. जो मराठीसाठी आहे त्यालाच मते द्यायची आहेत. मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी चालतो, ही विचारधारा पक्की केली पाहिजे, असे उद्गार मराठी राजभाषा निर्धार समिती गावाचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी काढले.
राजभाषा करताना भारतीय संविधानाच्या 345 कलमाचा वापर केला नाही. वास्तविक तो करायला पाहिजे होता. तसे न कऊन त्यावेळी मराठीवर अन्याय केला. जी मराठी भाषा प्रमाण होती ती राजभाषा न करता बोली असलेल्या आणि 95 टक्के ही बोली भाषा बोलतात तीच राजभाषा म्हणून केली, असे उदगार जेष्ठ कार्यकर्ते शाणुदास सावंत यांनी काढले. यावेळी श्रुतिका नाईक यांचे समयोचित भाषण झाले. यावेळी निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी मराठी राजभाषेसाठीची शपथ उपस्थिताकडून म्हणवून घेतली. गो. रा. ढवळीकर यांनी मराठी राजभाषेचे गायलेले गीत उपस्थितांनी एकमुखाने गाऊन घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण नाईक व प्रणय नाईक यांनी आणि आभार सुरेश डिचोलकर यांनी मानले. यावेळी मराठी प्रेमीची चांगली उपस्थिती होती