महिला अत्याचारांच्या घटनांनी कोकणही हादरले
राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी प्राधान्य देत असताना महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी झालेले नाही. कोकणातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असून मालवणमध्ये भर दिवसा महिलेवर पेट्रोल ओतून जाळण्याचा संतापजनक प्रकार नुकताच घडला. देवगड येथे पोलिसांकडूनच युवतीची छेड काढण्याचा प्रकार घडून जनतेचे रक्षकच भक्षक बनले. रत्नागिरी जिल्ह्यातही एका नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. महिलांवरील वाढणाऱ्या या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कोकणातही ऐरणीवर आला आहे.
.
कोलकत्ता येथे एका महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देशभर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही बदलापूर येथे शाळकरी चिमुरड्या मुलीवर अत्याचाराची निंदनीय घटना घडली. याविरोधात बदलापूरच्या नागरिकांनी रेलरोको आंदोलनही केले होते. या घटनेचेही पडसाद राज्यभर उमटले. विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना आरोप-प्रत्त्यारोपांनी घेरलं होतं. त्यानंतर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आणि त्या आरोपीचे पोलिसांकडून एन्काउंटरही झाले. मात्र, शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारने शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलत प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसविणे आणि सखी सुरक्षा समिती नेमण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
राज्यातील बदलापूर येथील महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची घटना घडली. त्याठिकाणीही नागरिकांनी आंदोलन केले व अत्याचार करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, या प्रकरणात चौकशीचे पुढे काय झाले, याचा उलगडा झालेला नाही. पोलिसांनी खरा प्रकार काय घडला हा जनतेसमोर आणलेलाच नाही. त्यामुळे एका मुलीवर अत्याचार होऊनसुद्धा पोलिसांकडून त्याचा पर्दाफाश केला जात नसेल, तर पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? महिलांना न्याय मिळवून देण्यात पोलीस तत्परता का दाखवित नाहीत? पोलिसांनी हे प्रकरण दडपले का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केले जात आहेत.
रत्नागिरीला महिला अत्याचाराच्या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील एका महिलेवर भर दिवसा पेट्रोल ओतून जाळण्याचा संतापजनक प्रकार घडलेला आहे. मालवण बसस्थानकासमोरील केजी डायग्नोस्टिक सेंटर या लॅबची प्रमुख असलेल्या प्रीती केळुसकर या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पेटलेल्या अवस्थेत ती महिला रस्त्यावर मदतीसाठी धावत आली. लोकांनी तिला मदतही केली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच सदरच्या गंभीर भाजलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंगावर पेट्रोल ओतून महिलेला जाळण्याच्या या धक्कादायक प्रकाराने मालवणच नव्हे, तर अख्खं कोकण हादरून गेले.
मालवणमध्ये महिलेला जाळून मारण्याची घटना ताजी असतानाच देवगडमध्ये एका युवतीची छेड व विनयभंग करण्याचा प्रकार घडला व तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना सुद्धा तेवढीच संतापजनक व धक्कादायक आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे त्या युवतीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला. नांदेडहून पर्यटनासाठी जिल्ह्यात आलेले सहाजण हे केवळ पर्यटकच नव्हे, तर पोलीस सेवेत असल्याचे उघड झाले होते. पर्यटनासाठी आलेल्या त्या संशयितांना आपण पोलीस सेवेत असल्याचा विसर पडला होता. त्यामुळे जनतेचे रक्षक असणारे हे पोलीस भक्षक बनल्याची प्रतिक्रीया उमटली होती.
युवतीची छेड काढण्याच्या घटनेने देवगडमधील नागरिकही आक्रमक झाले. सर्व संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर घेऊन जात असताना नागरिकांनी पोलिसांना रोखले. सर्व नराधमांचे चेहरे उघडे करून न्यायालयात चालत न्यावे. त्यांचे खरे चेहरे जनतेसमोर येऊ देत, अशी मागणी करून पोलिसांना धारेवर धरले. नागरिकांच्या अशा संतप्त भावनांमुळे पोलिसांना महिला अत्याचाराविरोधात जनतेचा आक्रमक चेहरा पहावा लागला.
रत्नागिरी, मालवण, देवगड येथील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी कोकणातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही काही घटना घडल्या आहेत. परंतु, आता सर्वत्र महिला सक्षमीकरणाबरोबरच सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जात आहे. तरीही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडू लागल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असेच म्हणावे लागेल. या घटना पुन्हा-पुन्हा घडू लागल्या, तर आता नागरिक शांत बसणार नाहीत. आता मोर्चा, आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात पोलिसांना कठोर पावले उचलावीच लागतील. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनानंतर त्याची तक्रार होऊन संशयितांवर गुन्हे दाखल होऊन अटक होते. परंतु, पुढे जाऊन पोलीस तपासातील त्रुटींमुळे हेच नराधम पुराव्याअभावी सुटतात आणि पुन्हा एकदा समाजात मोकाटपणे वावरताना दिसतात. काही खटल्यांत शिक्षाही होते. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेत न्याय मिळायला फार वेळ लागतो. त्यामुळे आजकाल लोकांना महिला अत्याचार घटनांमध्ये झटपट न्याय हवा आहे. आरोपींना फाशी होईल, तेव्हा होईल, त्या अगोदर आमच्या स्वाधीन करा. आम्ही काय ते बघतो, अशी मानसिकता वाढू लागली आहे. न्यायालयावर लोकांचा विश्वास आहे. परंतु न्याय मिळायला वेळ लागतो म्हणूनच तर बदलापूर प्रकरणातील आरोपीचे पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात महिला अत्याचाराच्या घटनांबाबत पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. किंबहुना अशा अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी खऱ्या अर्थाने ‘अॅक्शन मोड’वर यावे लागणार आहे. खाकी वर्दीचा धाक निर्माण करावा लागणार आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य आहे. या ब्रीद वाक्याचा अर्थ हा चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे असा आहे. परंतु, देवगडमध्ये युवतीची छेड प्रकरणात पोलीसच असल्याचे उघड झाल्याने लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनच असे संतापजनक प्रकार घडत असतील, तर खाकी वर्दीतील दुष्टांचा नाश कोण करणार, असा प्रश्न आहे. कोकण म्हटलं की, निसर्गसंपन्न आणि शांत असलेला प्रदेश.
कोकणात पुरुषांपेक्षा महिलांची संख्याही जास्त आहे आणि येथील महिला सुशिक्षितही आहेत. इथे हुंडाबळीसारखे प्रकारही घडत नाहीत. महिलांना चांगले स्थान दिले जाते. महिला अत्याचाराच्या घटना यापूर्वी कमी घडलेल्या आहेत. मात्र, रत्नागिरी, मालवण, देवगडमध्ये घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी कोकण हादरलेला आहे. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच आता सुरक्षिततेलाही प्राधान्य दिल्यास महिलांवरील अत्याचाराच्या घटना निश्चितपणे कमी होतील.
संदीप गावडे