कोकण ही कलावंताची भूमी ; मुलांनी चांगले चित्रपट पाहावेत
अभिनेते विजय पाटकर यांचे मालवण येथील चित्रपट महोत्सवात प्रतिपादन
मालवण (प्रतिनिधी)
कोकण ही कलावंताची भूमी आहे. या भागांतील मुलांनी चांगले चित्रपट पहावेत या उद्देशाने मालवणात कोकण चित्रपट महोत्सव भरविण्यात आला असून या चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या दर्जेदार चित्रपटामुळे इथल्या कलाकारांना एक दिशा मिळून निश्चितच नवीन कलाकार उदयास येतील असा आशावाद मराठी हिंदी चित्रपट नाट्य अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये बोलताना व्यक्त केला.
कोकण चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मालवणात आलेले सिंधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष आणि मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी आज मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कोकण चित्रपट महोत्सवा अंतर्गत भंडारी हायस्कुल मध्ये विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांचा शुभारंभही अभिनेते श्री. विजय पाटकर यांच्या हस्ते झाला. यावेळी विजय पाटकर यांनी चित्रपट व सिनेसृष्टीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक हणमंत तिवले यांच्या हस्ते विजय पाटकर यांचा शाल, श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी विजय पाटकर यांच्या पत्नी सौ. सरोज पाटकर, सिंधुरत्न कलावंत मंचचे सचिव विजय राणे, शिक्षक आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले.