कोनेरू हम्पी जागतिक जलद बुद्धिबळ विजेती
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताच्या कोनेरू हम्पीने रविवारी येथे इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करत ‘फिडे’ महिलांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सदर जेतेपद पटकावण्याची हम्पीची ही दुसरी खेप आहे. हम्पीने 2019 मध्ये जॉर्जिया येथे ही स्पर्धा जिंकली होती आणि भारताची ही अव्वल खेळाडू एकापेक्षा जास्त वेळा विजेतेपद पटकावण्याच्या बाबतीत चीनच्या जू वेनजुननंतरची दुसरी खेळाडू आहे. 37 वर्षीय हम्पीने 11 पैकी 8.5 गुणांसह स्पर्धा पूर्ण केली.
पहिल्या फेरीतील पराभवाने येथे स्पर्धेची सुऊवात करणारी हम्पी 11 व्या आणि शेवटच्या फेरीत विजेती ठरली आणि सहकारी डी. हरिकासह इतर सहा खेळाडूंपेक्षा ती अर्ध्या गुणांनी पुढे राहिली. ‘मी खूप उत्साहित आहे आणि मला खूप आनंद वाटत आहे. खरे तर मला अपेक्षा होती की, दिवस खूप कठीण जाईल आणि टायब्रेकरसारख्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. पण जेव्हा मी खेळ संपवला तेव्हा आर्बिट्रेटरने मला विजेतेपद मिळाल्याचे सांगितले. तो माझ्यासाठी तणावपूर्ण क्षण होता’, असे काळ्या सोंगाट्या घेऊन खेळलेल्या हम्पीने सांगितले.
हे अगदी अनपेक्षित आहे, कारण वर्षभर मी खूप संघर्ष करत राहिलेली आहे आणि माझ्यासाठी खूप स्पर्धा खराब राहिलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या मागील स्पर्धेत मी शेवटच्या स्थानावर राहिले. त्यामुळे हे आश्चर्यकारक आहे, असे ती पुढे म्हणाली. सिंगापूर येथे नुकत्याच झालेल्या क्लासिकल स्वरुपातील जागतिक स्पर्धेत डी. गुकेश चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून जगज्जेता बनल्यानंतर हम्पीच्या यशाने भारतीय बुद्धिबळसाठी वर्षाची अखेर सनसनाटी पद्धतीने केली आहे.
पहिल्या फेरीतील पराभवानंतर मी विजेतेपदाचा विचार सोडून दिला होता. परंतु गोष्टी चांगल्या पद्धतीने घडल्या. विशेषत: शनिवारी सलग चार सामने जिंकल्याने मला मदत झाली, असे हम्पीने सांगितले. भारत आणि अमेरिका यांच्यातील वेळेच्या अंतरामुळे हम्पीला काही आव्हानांचा सामना करावा लागला. ‘वेळेचा फरक हे माझ्यासाठी खूप अवघड होते. मला झोप लागत नव्हती. येथे आल्यापासून मी नीट झोपलेले नाही. त्यामुळे अस्वस्थ असूनही खेळणे सोपे नव्हते’, असे ती पुढे म्हणाली.
मुर्झिनला पुऊषांचे विजेतेपद
नंतर, रशियाच्या 18 वर्षीय वोलोदार मुर्झिनने पुऊष विभागातील जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हनंतर मुर्झिन हा दुसरा सर्वांत तऊण फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन बनला आहे. अब्दुसत्तारोव्हने 17 व्या वर्षी विजेतेपद पटकावले होते.
पंतप्रधान मोदींकडून कौतुक
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये तिचे अभिनंदन करताना मोदींनी तिचे धैर्य आणि हुशारी लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असे म्हटले आहे. ‘हा विजय आणखी ऐतिहासिक आहे. कारण हे तिचे दुसरे जागतिक जलद बुद्धिबळ विजेतेपद आहे. अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय खेळाडू बनली आहे, असेही त्यात पंतप्रधानांनी नमूद केले आहे.