For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोनेरु हम्पीला फिडे महिला ग्रँड प्रिक्स विजेतेपद

06:00 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोनेरु हम्पीला फिडे महिला ग्रँड प्रिक्स विजेतेपद
Advertisement

कोनेरु हम्पीची झू जीनरवर टायब्रेकर गुणांमध्ये मात : महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखला तिसरे स्थान

Advertisement

पुणे : फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत भारताची अव्वल महिला बुद्धिबळ पटू कोनेरु हम्पी व चीनची झू जीनर या दोघींनी नवव्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवल्यामुळे झालेल्या गुण बरोबरी नंतर हम्पीने टायब्रेकर गुणांच्या आधारावर विजेतेपद संपादन केले.

अमनोरा द फर्न येथे पार पडलेल्या या स्पर्धेत आज नवव्या फेरीत कोनेरु हम्पीने सालिनोव्हा न्यूरघ्युनवर तर, झू जीनरने पोलिना शुव्हालोवावर निर्णायक विजय मिळविल्यावर हम्पी व जीनर या दोघीही 7 गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर राहिल्या. त्यामुळे विजेतेपद निश्चित करण्यासाठी टायब्रेकर गुणांचा अवलंब करण्यात आला. यामध्ये हम्पीने बाजी मारली. मात्र, विजेतेपदाची पारितोषिक रक्कम व ग्रां-प्री मानांकन गुण दोघींनाही विभागून देण्यात आले. दोघींनीही या स्पर्धेतून प्रत्येकी 117.5 मानांकन गुणांची कमाई केली. या स्पर्धा मालिकेतील अखेरचा सहावा टप्पा पुढच्या महिन्यात ऑस्ट्रिया येथे होणार आहे. वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने चार विजय तीन बरोबरी आणि 2 पराभव अशा कामगिरी सह 5.5 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. तिचे दोन पराभव हम्पी व जीनर यांच्याविरुद्धच होते.

Advertisement

तत्पूर्वी, हम्पी विरुद्ध सालिनोव्हा न्यूरघ्युन हिने स्लाव्ह बचावाचा वापर करुन सुरुवात केली. मात्र, हम्पीने पहिल्यापासूनच आक्रमक दिसत होती. हम्पीने आपला  उंट न्यूरघ्युनच्या राजाच्या बाजूला अशा ठिकाणी बसविला की, न्यूरघ्युनला कॅस्लिंग करता आले नाही. न्यूरघ्युन हिने 16व्या चालीत धोका पत्करून हत्ती पुढे आणला. मात्र, हम्पीवर त्याचा परिणाम झाला नाही. तिने 19 व्या चालीनंतर न्यूरघ्युनच्या राजावर दडपण आणून संपूर्ण आक्रमक भूमिका घेतली. दोघींमधील ही लढत काही काळ चुरशीची झाली, मात्र हम्पीने 84 व्या चालीत विजयाची पूर्तता केली.

जीनर विरुद्ध पोलिना हा डाव इटालियन ओपनिंगमुळे रंगतदार ठरला. मात्र, जीनरने संपूर्ण डावावर वर्चस्व मिळवत 76 व्या चालीत विजयाची नोंद केली.  आणखी एक सामन्यात एलिना कॅशलीनस्कायाने दिव्या देशमुख विरुद्ध फ्रेंच बचावाने प्रारंभ केला. मात्र, दोघींनीही पटावर बरोबरी राखत 42 चाली नंतर सामना अनिर्णित ठेवला. कँडिडेट स्पर्धेसाठी अलेक्सेंड्रा गोरायचिंका 308.8 गुणांसह अव्वल स्थानासह आपला प्रवेश निश्चित केला असून हम्पी 279.17 गुणांसह तिच्या पाठोपाठ आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, एमसीएचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयसीएचे सह सचिव मनिष कुमार, एमसीएचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, चीफ आरबीटर इव्हान सायरोव आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल नववी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:

  • वैशाली रमेशबाबू (4 गुण,भारत)   बरोबरी वि. मेलिया सॅलोम (3 गुण, जॉर्जिया),
  • कोनेरु हम्पी (7 गुण, भारत)        वि.वि. सालिनोव्हा न्यूरघ्युन (3.5 गुण, बल्गेरिया),
  • दिव्या देशमुख (5.5 गुण, भारत)   बरोबरी वि. कॅशलीनस्काया           (3 गुण, पोलंड),
  • पोलिना शुव्हालोवा (4.5 गुण, रशिया)        पराभुत वि.झू जीनर          (7 गुण,चीन),
  • हरिका द्रोणावल्ली (4.5 गुण, भारत)         बरोबरी वि. मुनगुंतूल        (3 गुण, मंगोलिया).
Advertisement
Tags :

.