कोंडसकोपच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला
अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे विद्यार्थी-पालक संतप्त : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कोंडसकोप गावाला नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी हलगा येथे बुधवारी राष्ट्रीय महामार्ग रोखला. केवळ विद्यार्थीच नाहीतर त्यांचे पालकही या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अचानक महामार्ग रोखल्याने प्रशासनाला जाग आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महामार्ग रोखू नये, अशी विनंती करण्यात आली. बेळगाव शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंडसकोप गावाला केवळ दिवसातून दोनवेळा बससेवा उपलब्ध आहे. तीदेखील योग्यवेळी नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करत राष्ट्रीय महामार्गानजीक येऊन थांबावे लागते. के. के. कोप, हिरेबागेवाडी, तसेच इतर गावच्या बसवर विद्यार्थ्यांना अवलंबून रहावे लागते. परंतु, या बस गावातूनच फुल्ल भरून येत असल्याने त्या कोंडसकोप कॉर्नरजवळ थांबविल्या जात नाहीत. एका बससाठी तासभर वाट पहावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग हलगानजीक रोखला. महामार्ग रोखून विद्यार्थ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. यानंतर प्रशासनाला जाग आली आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. विनंती करून विद्यार्थ्यांना महामार्गापासून बाजूला करण्यात आले. तसेच गावासाठी बस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची निदर्शने
कोंडसकोप गावातील अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी बेळगाव शहरात येतात. परंतु, सुरळीत बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गासोबतच बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. गावासाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून द्यावी, तसेच बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
बसफेऱ्या न वाढविल्यास पुन्हा आंदोलन करणार
कोंडसकोप गावाला बस उपलब्ध आहे. परंतु, त्या बसचा विद्यार्थ्यांना काहीच फायदा नाही. त्यामुळे शाळा-कॉलेजच्या वेळेत बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दुसऱ्या गावच्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तेथील कंडक्टर विद्यार्थ्यांना अरेरावी करतात. त्यामुळे कोंडसकोप गावाला बसफेऱ्या न वाढविल्यास पुन्हा राष्ट्रीय महामार्ग रोखला जाणार आहे.
- साक्षी पाटील, विद्यार्थिनी
