For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच, व्हेरेव्ह, रायबाकिना दुसऱ्या फेरीत,

06:58 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच  व्हेरेव्ह  रायबाकिना दुसऱ्या फेरीत
Advertisement

`ब्रिटनचा ड्रेपरही विजयी, आंद्रे रुबलेव्ह पहिल्याच फेरीत पराभूत, मरेची एकेरीतून माघार

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

माजी चॅम्पियन इलेना रायबाकिना, चौथा मानांकित जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, सातवेळचा चॅम्पियन सर्बियाचा दुसरा मानांकित नोव्हॅक जोकोविच यांनी येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. मात्र रशियाच्या रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisement

रायबाकिनाने रोमानियाच्या पात्रता फेरीतून आलेल्या इलेना गॅब्रिएला रुसवर 6-3, 6-1 अशी एकतर्फी मात केली. एक तास 11 मिनिटे ही लढत चालली होती. रायबाकिनाने 2022 मध्ये विम्बल्डन जेतेपद पटकावले होते. प्रथम सर्व्हिसची लय सापडण्याआधी तिला झगडावे लागले. पण नंतर या कझाकच्या चौथ्या मानांकित खेळाडूने नियंत्रण मिळवित पूर्ण वर्चस्व राखले आणि दुसऱ्या मॅचपॉईंटवर सहज विजय साकार केला. या वर्षात तिने महिला टूरवर सर्वाधिक 270 बिनतोड सर्व्हिस नोंदवल्या आहेत.

पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बाएनावर 6-2, 6-4, 6-2 असा विजय मिळवित पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. वेगवान सर्व्हिस व पॉवरफुल फोरहँड फटक्यांसमोर बाएनाचा टिकाव लागला नाही. गेल्या महिन्यात झालेल्या प्रेंच ओपन स्पर्धेत व्हेरेव्हने अंतिम फेरी गाठली होती. पण त्याला जेतेपद मिळविता आले नव्हते.

पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्ण बरा झालेल्या जोकोविचनेही दुसरी फेरी गाठताना झेकच्या पात्रता फेरीतून आलेल्या व्हिट कोप्रिव्हाचा 6-1, 6-2, 6-2 असा फडशा पाडला. दुसऱ्या सेटमध्ये 21 शॉट्सची एक रॅली जोकोविचने जिंकली. यानंतर मात्र जोकोविचने वर्चस्व राखत निर्णायक विजय मिळविला.

मरेची एकेरीतून माघार

ब्रिटनच्या 22 वर्षीय जॅक ड्रेपरने दुसरी फेरी गाठताना स्वीडनचा क्वालिफायर इलियास वायमरचा पाच सेट्सच्या झुंजार लढतीत 3-6, 6-3, 6-3, 4-6, 6-3 असा पराभव केला. ड्रेपरने पंधरा दिवसापूर्वी झालेल्या क्वीन्स क्लब स्पर्धेत कार्लोस अल्कारेझला पराभवाचा धक्का दिला होता. याशिवाय त्याने नोरीला मागे टाकत ब्रिटनचा अग्रमानांकन मिळविले आहे.

दोन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या अँडी मरेला शेवटचे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण त्याने एकेरीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. मात्र मिश्र दुहेरीत तो आपल्याच देशाच्या एम्मा राडुकानूसमवेत खेळणार आहे.

रशियाच्या सहाव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याला अर्जेन्टिनाच्या फ्रान्सिस्को कॉमेसानाने 6-4, 5-7, 6-2, 7-6 (7-5) असा पराभवाचा धक्का दिला. फ्रान्सिस्को जागतिक क्रमवारीत 122 व्या स्थानावर आहे. पहिला सेट गमविल्यानंतर मुसंडी मारत रुबलेव्हने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली होती. पण सर्व्हिसमध्ये सातत्य राखता न आल्याने त्याला संघर्ष करावा लागला. तिसरा सेट जिंकून फ्रान्सिस्कोने आघाडी घेतली आणि टायब्रेकरपर्यंत लांबलेला चौथा सेट 7-5 असा जिंकून फ्रान्सिस्कोने दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. रुबलेव्हने मागील वर्षी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पहिल्या फेरीत पराभूत होणारा तो सर्वोच्च मानांकित खेळाडू बनला आहे. कॉमेसानाची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या अॅडम वाल्टनशी होईल.

Advertisement

.