कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज पंजाब किंग्जशी
कोलकाता नाइट रायडर्सच्या सामना आज शुक्रवारी नेहमी क्षमतेहून कमी कामगिरी करत आलेल्या पंजाब किंग्जशी होणार असून यावेळी कोलकाताचा गोलंदाजी विभाग अधिक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करेल. खास करून मिशेल स्टार्क त्याच्या 3 दशलक्ष डॉलर्स इतक्या किमतीला सार्थ ठरविणारी कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक असेल. ‘केकेआर’ सध्या 10 संघांच्या गुणतालिकेत 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून आघाडीवर असलेल्या राजस्थान रॉयल्सपेक्षा (14 गुण) ते चार गुणांनी मागे आहेत आणि संघाला मिळालेले यश हे मुख्यत्वे वरच्या फळीतील फलंदाजांच्या प्रयत्नांमुळे लाभलेले आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जला सातत्य दाखविता आलेले नसून शशांक सिंग आणि आशुतोष शर्माच्या रुपाने त्यांना दोन चांगले खेळाडू गवसूनही महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे ते यंदाही प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. . केकेआरतर्फे सुनील नरेन (286 धावा) आणि फिल सॉल्ट (249) हे अव्वल स्थानी आहेत. आंद्रे रसेल (155 धावा), कर्णधार श्रेयस अय्यर (190 धावा) यांनीही बऱ्यापैकी धावा केल्या आहेत. सात सामन्यांत केवळ 67 चेंडूंचा सामना केलेल्या रिंकू सिंगचा स्ट्राइक रेटही 160 च्या जवळपास आहे. कर्णधार अय्यर वगळता सर्व प्रमुख फलंदाजांनी 150 हून अधिक स्ट्राइक-रेटने धावा केल्या आहेत. केकेआरने आतापर्यंत त्यांच्या सात सामन्यांमध्ये चार वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. केवळ व्यंकटेश अय्यरचा खराब फॉर्म त्यांना सतावत आहे आणि नितीश राणाच्या बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे त्यांना एका ऑफब्रेक गोलंदाजाला मुकावे लागले आहे.
कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन सकरिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रेहमान.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव्ह.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप