संघर्ष करणाऱ्या मुंबईशी आज कोलकाताचा सामना
वृत्तसंस्था /मुंबई
आयपीएल गुणतालिकेत विऊद्ध टोकांना असलेले कोलकाता नाईट रायडर्स व मुंबई इंडियन्स हे दोन संघ आज शुक्रवारी येथे भिडणार असून यावेळी कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या त्रुटी दूर करण्याचा आणि संघर्ष करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या कमकुवत दुव्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. नऊ सामन्यांमध्ये सहा विजयांसह त्यांना 12 गुण मिळाले आहेत आणि आयपीएल गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफमधील स्थान त्यांच्या आवाक्यात असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. परंतु श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी विविध विभागांमध्ये सातत्य दाखवावे लागेल आणि घसरण टाळावी लागेल. केकेआरने मागील सहा सामन्यांमध्ये तीन पराभव स्वीकारलेले असून पंजाब किंग्जने विक्रमी लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरीत्या करताना त्यांना दणका दिला. केकेआरला त्यांच्या आक्रमक फलंदाजांचा लाभ झालेला असला, तरी त्यांच्या गोलंदाजीत सुधारणा आवश्यक आहेत. मिचेल स्टार्कने प्रति षटक जवळपास 12 धावा दिल्या आहेत आणि आठ सामन्यांमध्ये केवळ सात बळी घेतले आहेत.
हर्षित राणा या मोसमात केकेआरतर्फे सर्वाधिक बळी (11) घेणाऱ्यांपैकी एक असला, तरी दिल्ली कॅपिटल्सच्या अभिषेक पोरेलला बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना दाखविलेला अतिउत्साह त्याला महागात पडल असून त्याच्यावर एका सामन्याची बंदी आहे. वैभव अरोराने प्रभावी कामगिरी करताना पाच सामन्यांमध्ये नऊ बळी घेतलेले आहेत. या सामन्यात प्रकाशझोत रिंकू सिंगवर देखील असेल, त्याला टी-20 विश्वचषकासाठीच्या भारताच्या मुख्य संघातून वगळण्यात आल्याने या 26 वर्षीय खेळाडूबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. या पॉवर-हिटरला या हंगामात खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही मुंबई इंडियन्सचे जरी अजून पाच सामने बाकी असले, तरी प्लेऑफची शर्यत त्यांनी गमावल्यात जमा आहे. जरी मुंबई इंडियन्सने यापैकी प्रत्येक सामना जिंकला, तरी त्यांना फक्त 16 गुण मिळू शकतात आणि ते गुणतालिकेत मध्यभागी आहेत. जसप्रीत बुमराह (14 बळी) आणि गेराल्ड कोएत्झी (13) हे गोलंदाजीत प्रभावी राहिले आहेत. परंतु त्यांचे प्रभावी प्रदर्शन असूनही फलंदाजांच्या सामूहिक अपयशामुळे संघाला यंदाचा हंगाम खराब गेला आहे. या आयपीएलमध्ये तीन अर्धशतकांसह 343 धावा करणारा तिलक वर्मा मुंबईचा सर्वोत्कृष्ट फलंदाज राहिला आहे. परंतु त्याची कामगिरी इतरांचे अपयश लपवण्यास पुरेशी ठरलेली नाही. इशान किशनने पॉवरप्लेमध्ये बाद होणे ही त्यांच्यासाठी या मोसमातील सर्वांत मोठी समस्या आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही सातत्याने मोठी धावसंख्या उभारून दिलेली नाही. याशिवाय सूर्यकुमार यादवकडेही सर्वांचे लक्ष असेल. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याही उर्वरित सामन्यात आपली कामगिरी सुधारू शकतो काय हे पाहावे लागेल.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवलिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, हार्विक देसाई, नेहल वढेरा, ल्यूक वूड.
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रहमान, गस अॅटकिन्सन, गझनफर, फिल सॉल्ट.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा अॅप.