For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरच्या स्वाती शिंदेचे सुवर्णयश

06:10 AM Feb 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापूरच्या स्वाती शिंदेचे सुवर्णयश
Advertisement

38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड : कुस्तीत स्वातीची यशाला गवसणी, आदर्श पाटीलला रौप्य : टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य

Advertisement

वृत्तसंस्था/डेहराडून

कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदेने गेली दशकभर ऊराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटीलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या यशाचा जल्लोष शेवटच्या दिवशीही घुमला. 53 किलो वजन गटात स्वाती शिंदेने मध्य प्रदेशच्या पूजा जाटला 5-1 गुणांनी नमवून स्पर्धेतील महाराष्ट्रासाठी कुस्तीतील एकमेव सुवर्णयश संपादन केले.

Advertisement

उपांत्य फेरीत कुस्तीला 25 सेकंद बाकी असताना दंगल चित्रपटाची आठवण करून देणारा 4 गुणांचा साईट थ्रो मारुन स्वातीने हरियाणाच्या ज्योतीला नमवताना कुस्तीशौकिनांची मने जिंकली होती. मध्य प्रदेशची आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पूजा जाटविरुद्ध लढतीत स्वाती शिंदेने कडवी झुंज दिली. पहिल्या फेरीमध्ये स्वाती केवळ 1 गुणाने आघाडीवर होती. दुसऱ्या फेरीमध्ये स्वातीने भारंदाज डावावर सलग 4 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्वाती मुरगूड येथील लेकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.

कोल्हापूरच्या आदर्शला रौप्य

74 किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरचा आदर्श पाटीलला सेनादलाच्या जयदीपकडून 10-0 गुणाने पराभूत व्हावे लागले. यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हरिद्वार येथे संपलेल्या कुस्ती स्पर्धेत 1 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्य अशी 9 पदकांची लूट महाराष्ट्राच्या मल्लांनी केली. स्वाती शिंदेने सुवर्ण, भाग्यश्री फंड, आदर्श पाटीलने रौप्य, तर अक्षय डेरे, हर्षवर्धन सदगीर, अमृता पुजारी, हितेश सोनावणे, दिग्विजय भोंडवे, अश्लेशा बागडे, आदर्श पाटील यांनी कांस्यपदकावर नाव कोरले.

टेबल टेनिसमध्ये दिया-स्वस्तिका जोडीला सुवर्ण, स्वस्तिकाला रौप्य

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला एक सुवर्ण, एक कांस्यपदक मिळाले. दिया चितळे व स्वस्तिका घोष या जोडीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये महिला दुहेरीचे सुवर्ण पदक जिंकून दिले. त्यानंतर महिला एकेरीच्या संघर्षपूर्ण अंतिम लढतीनंतर महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पृथा वर्टीकरला कांस्यपदक मिळाले. महिला दुहेरीत दिया चितळे व स्वस्तिका घोष या महाराष्ट्राच्या जोडीने  निथाया श्री मनी व काव्य श्री बैस्सा या तामिळनाडूच्या जोडीचा 3-2 असा पराभव करून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदकांची बाजी मारून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महिलांच्या टेट्रार्थलॉनमध्ये दीक्षा यादवने वैयक्तिक व सांघिक गटात सुवर्णयशाला गवसणी घातली. मिश्र प्रकारातही दीक्षा यादव व सौरभ पाटीलने रूपेरी यश संपादून पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. गौलापार येथे संपलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सलग चौथा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णदिन ठरला. महिलांच्या टेट्रार्थलॉनमध्ये महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने चमकदार कामगिरी केली. तिने 946 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तिची सहकारी मुग्धा वाव्हळ 921 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. उत्तराखंडची भार्गवी रावत 916 गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. सांघिक प्रकारात दीक्षा संदीप यादव, मुग्धा वाव्हळ आणि दीप्ती काळमेघने 2749 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. उत्तराखंडच्या संघाने महाराष्ट्राला चिवट लढत दिली आणि 2419 गुणांसह रौप्य पदक जिंकले. मिश्र प्रकारात 824 गुणांची कमाई करीत दीक्षा यादव व सौरभ पाटीलने रौप्य पदकावर नाव कोरले. 839 गुणांसह मध्यप्रदेशच्या जोडीने सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, महाराष्ट्राच्या पुरूष संघाने 4 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्य तर महिला संघाने 5 सुवर्ण, 3 रौप्य पदकांची लयलूट करीत सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकविला.

महाराष्ट्र केसरी ठरले पदकाचे मानकरी,हर्षवर्धन सदगीर, अमृता पुजारीला कांस्यपदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांनीही ठसा उमटविला. भाग्यश्री फंड पाठोपाठ हर्षवर्धन सदगीर, अमृता पुजारी हे महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकाचे मानकरी ठरले आहेत. रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात फ्रीस्टाईल 125 किलो वजनी गटात हर्षवर्धन सदगीरने कांस्यपदकावर नाव कोरले. दिल्लीच्या लक्ष्य विरूध्द झुंजताना नाशिकच्या हर्षवर्धनने तीन गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत लपेट डावावर चितपट कुस्ती करीत त्याने कांस्यपदक जिंकले. पुण्यात 2020 साली महाराष्ट्र केसरीची गदा उंचविणाऱ्या हर्षवर्धनचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक होय.

महिलांच्या  फ्रीस्टाईल 76 किलो वजन गटात कोल्हापूरच्या अमृता पुजारीने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. गुजरातच्या सनोफर विरूध्दच्या लढतीत अमृताने सुरुवातीलाच आक्रमण करीत पदकाकडे कूच केली. सनोफरला लपेट डावावर चितपट करून सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाचे यश संपादन केले. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील या सुवर्णकन्येने बँकॉक येथे झालेल्या ज्युनियर आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जॉर्डनमधील 23 वर्षाखालील आशियाई स्पर्धेतही रौप्यपदकाचा करिश्मा घडविला आहे.

Advertisement
Tags :

.