Kolhapur Crime : कोल्हापूरच्या इसमावर वकील महिलेचा बलात्कार
गुंगीचे औषध देऊन अत्याचार, पीडित पुरुषाचा आरोप
कोल्हापूर : पुण्यातील एका महिला वकिलाने कोल्हापूरच्या एका इसमावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिला वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या व्यक्तीने या महिला वकिलाविरोधात लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून गुंगीचे औषध देऊन या महिला वकिलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. ही महिला वकील या व्यक्तीला प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे २ लाखांची मागणी करत होती. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
कोथरूड पोलिसांनी महिला वकिलाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या महिला वकिलाने याआधी देखील अनेक पुरूषांना अशाच पद्धतीने छळ केल्याचा आरोप आहे. पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ते आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत ७ नोव्हेंबर २०२४ ला तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. त्याठिकाणी महिला वकिलासोबत त्यांची ओळख झाली. त्यावेळी महिला वकिलाने त्यांच्या बायकोचा फोन नंबर घेतला. ती बारंबार बायकोला फोन करत होती. अनेकदा त्यांच्या घरी देखील येऊन राहिली.
तिने त्यांना भाऊ मानले होते. हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करत असल्याचे तिने सांगितले होते. कोल्हापुरला त्यांच्या घरी आल्यानंतर ती त्यांना दुचाकीवरून बेळगावला कलावती मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेली. त्यावेळी तिने त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी वकिलाला हटकले आणि यापुढे असे करू नको आणि आमच्या घरी येऊ नको असे सांगितले.
त्यावेळी तिने त्यांची माफी मागितली आणि असे करणार नाही असे सांगितले, त्यानंतर ते कोल्हापुरात आले. ती दोन दिवस त्यांच्या घरी राहिली. त्यानंतर तिला सोडले ते चंदगड बस स्टँडवर गेले. तेव्हा वॉशरूमला जायचे असून मी उघड्यावर जात नाही असे ती म्हणाली. तर तिला त्यांनी लॉजवर जाण्यास सांगितले.तिथे तिने त्यांच्यासोबत पुन्हा चुकीचे वागण्याचा प्रयत्न केला. मी वकील असून माझ्या ओळखीने तुमच्या मुलाला मंत्रालयात कामाला लावेल, असे सांगितले आणि तिथून ती पुण्याला निघून गेली.
त्यानंतर ती सतत त्यांच्या बायकोच्या संपर्कात राहिली. एकदा तिने फोन करून त्यांच्या बायकोला सांगतिले की मी आणि माझ्या मैत्रिणीचे कुटुंबीय काशी विश्वनाथला दर्शनासाठी जाणार आहे. तर माझ्या भावाला म्हणजे तुझ्या नवऱ्याला देखील पाठव, असे सांगतिले. ते बायकोच्या सांगण्यावरून महिला वकिलासोबत जाण्यास तयार झाले. त्यासाठी ते पुण्यात आले.
त्यावेळी तिने त्यांना माझ्या मैत्रिणीची सासू वारली आहे त्यामुळे तिचे येणं रद्द झाले असे सांगितले. त्यामुळे आता आपण दोघेच काशी विश्वनाथला जायचे असल्याचे म्हणाली. ती तिच्या घरी त्यांना घेऊन गेली. ते झोपलेले असताना तिने त्यांना काही तरी गुंगीचे पेय प्यायला देऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते चिडले आणि रागाच्या भरात कोल्हापुरला जाण्यास निघाले असता तिने माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही असे सांगितले.
त्यानंतर दोघे विमानाने काशी विश्वनाथला गेले. तिथे या महिलेने त्यांची फसवणूक केली. एकच हॉटेल रूम बुक करून त्यांच्यासोबत पुन्हा अतिप्रसंग केले. त्याठिकाणी ३ दिवस ठेवून घेतले. तिथे कुणाला काही सांगितले तर बदनामी करेल, तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर आताच्या आता २ लाख रुपये दे अशी मागणी केली. नाही तर तुझ्याविरोधात पोलीस ठाण्यात खोटी तक्रार करेल, अशी देखील धमकी दिली. त्यानंतर त्यांनी या महिलेच्या तावडीतून कशी तरी सुटका करत कोल्हापूर गाठले. त्यानंतर काही दिवसांनी या वकिलाने पुन्हा फोन करून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. २ लाख रुपये दे असे सांगितले. त्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.