बास्केटबॉलमधील कोल्हापुरी चमकता तारा : केदार सुतार
सहावेळा केले राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघातून प्रतिनिधीत्व 23 राष्ट्रीय व सव्वाशेवर राज्यस्तरीय खेळाडू घडवले, महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदाची धुराही नेटाने सांभाळी कोल्हापूरात कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, क्रिकेट, जलतरण, बुद्धिबळ, ज्युदो, तायक्वाँदो या खेळांचा मोठा बोलबाला आहे. या तुलनेत बास्केटबॉल खेळ मात्र मागे आहे. जिह्यात बास्केटबॉलचे फक्त बाराच संघ आहेत. शाळा, कॉलेजमधील संघही फक्त स्पर्धेपुरते मर्यादीत असतात. त्यामुळे बास्केटबॉलचा म्हणावा तितका बोलबाला कोल्हापूरात नाहीच. अशा स्थितीत कोल्हापूरातील केदार सुरेश सुतारने बास्केटबॉलमध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. सहा वेळा राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करताना राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावलौलिकही मिळवला आहे. गेल्या 4 वर्षांपासून तो प्रशिक्षक म्हणून देशपातळीवर चमकतानाच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेल्या महाराष्ट्र संघाच्या सहायक व मुख्य प्रशिक्षकपदाची धुराही सांभाळली आहे. केदारने तयार केलेल्या 23 खेळाडूंनी फेडरेशनच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तर सव्वाशे खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले आहे...
बास्केटबॉलचे मैदान गाजवण्यासाठी खेळाडूला डावा आणि उजवा हात एकाच वेळी चालवावा लागतो. इतर चेंडूपेक्षा मोठा असलेल्या बॉस्केटबॉलवर नियंत्रण ठेवत विरुद्ध संघावर बिनचुकपणे बास्केट करून आपल्या संघाला गुणही मिळवून द्यावे लागतात. जो खेळाडू बास्केटबॉलच्या सामन्यात दोन्ही हात उत्तमपणे चालवतो, बिनचुक बास्केट टाकतो तोच प्रेक्षकांच्या नजरेला येतो. सामना खेळण्यासाठीही निवडल्या जाणाऱ्या प्लेइंग फाईव्हच्या संघातही तो स्थान मिळवतो, असे बास्केटबॉल टॅलेंटचे गमक आहे. कोल्हापुरातील केदार सुतारने या गमकनुसार कठोर परिश्रम कऊन स्वत:ची दर्जेदार खेळाडू म्हणून आपली प्रतिमा बनवली. सामन्यात त्याने दोन्ही हात चालवतानाच बिनचुकपणे विऊद्ध संघावर बास्केट टाकतानाच आपल्या संघातील खेळाडूनांही बास्केट टाकण्यासाठी अचुक पास देण्याचे कौशल्य आत्मसात करत महाराष्ट्रासह देशभरातील मैदाने गाजवली आहे. इतकेच नव्हे तर फेडरेशन आयोजित महाराष्ट्र वरिष्ठ पुरुष गट बास्केटबॉल स्पर्धेत कोल्हापूर संघातून 12 वर्षे खेळताना कन्सिटंन्सी परफॉमेंस केला आहे.
केदारचा बास्केटबॉलमधील श्रीगणेश: हा शाहुपुरीतील वि. स. खांडेकर प्रशालेत आठवीमध्ये शिकत असताना सुऊ झाला. शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानात त्याला मैत्रीण रसिया पडळकर यांच्याकडून त्याला बास्केटबॉलचे धडे मिळू लागले. दैनंदिन सरावामुळे बास्केटबॉलचा आत्मा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या चेंडूचे ड्रिबलिंग करण्यात केदार परांगत झाला. याचवेळी खांडेकर प्रशालेतील क्रीडा शिक्षक दगडू रायकर यांच्याकडूनही त्याला बास्केट कशी टाकायची, पासिंग कसे करायचे, विरुद्ध संघावर अॅटॅक कसा करायचा याचे प्रशिक्षण मिळत राहिले. त्याच्या जोरावर केदार कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आयोजित कोल्हापूर जिल्हा 13 वर्षाखालील मुलांच्या बस्केटबॉल संघ निवड चाचणीत सहभागी झाला. येथूनच केदारच्या स्पर्धात्मक कामगिरीला सुरुवात झाली. बास्केटबॉल अंगातच भिनलेला असल्याने केदारने कोल्हापूर जिल्हा संघात लिलया स्थान मिळवले. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने संघाच्या प्लेइंग फाईव्हमध्येही स्थान मिळवले. स्पर्धेत केदारसह संघातील अन्य खेळाडूंनी विविध संघांना टक्कर देते उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्यपूर्व सामन्यात मात्र झालेला पराभव संघातील खेळाडूंच्या जिव्हारी लागला होता. योगायोगाने कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनने कोल्हापूरातच राज्यस्तरीय 13 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा कठोर सरावाच्या जोरावर एकहाती जिंकून कोल्हापूर संघाने नाशिकमधील पराभवाची नाराजी दुर केली. जमेची बाजू म्हणजे प्रत्येक सामन्यात केदारने विऊद्ध संघांवर 15 ते 20 बास्केट टाकण्याचा पराक्रम केला होता. अंतिम सामन्यात तर केदारने विऊद्ध मुंबई दक्षिण संघावर पहिल्या पाच सेकंदात बास्केट टाकण्याचा विक्रम केला. नववी आणि दहावीमध्ये शिकताना केदारने राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत दोनदा महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र संघापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने वि. स. खांडेकर हायस्कूलच्या संघातून मनपास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला महाराष्ट्र संघ निवड चाचणीसाठी पात्र ठरवले गेले. चाचणीतून त्याने संघात स्थान मिळवत राष्ट्रीय बास्केटबॉलपटू होण्याच्या दिशेने पाऊल टाकले. दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना केदारने विरुद्ध संघावर लाजवाब बास्केट टाकल्या होत्या. त्याची दखल घेऊन स्पर्धा आयोजकांनी केदारला स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवले. दिल्लीतच झालेल्या आणखी एका राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना केदारने उत्कृष्ट खेळ केला. दहावीनंतर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार नाईट कॉलेजात प्रवेश घेतला. 2003 साली नाईट कॉलेजच्या संघात केदारचे एंट्री झाली आणि संघाची विभागीय स्पर्धेतील पराभवाची शृंखला खंडित झाली. शिवाय 2003 आणि 2004 सालच्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाईट कॉलेजला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यात केदारचाच मोठा वाटा राहिला. 2003 साली झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या अॅग्रेसिव्ह खेळाची दखल घेऊन महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनने केदारला महाराष्ट्र 19 वर्षाखालील मुलांच्या संघ निवड चाचणीसाठी निमंत्रित केले. बालेवाडीत (पुणे) झालेल्या चाचणीत केदारने ड्रिबलिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि बास्केट टाकण्याचे कौशल्य निवड समितीला दाखवून संघात स्थान मिळवले. अमृतसरमध्ये राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत केदारने दिलेल्या पासवरच खेळाडूंनी विरुद्ध संघावर बास्केट टाकत महाराष्ट्र संघासाठी तिसरा क्रमांक खेचून आणला.
2004 साली वारणानगरातील तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनीच्या शास्त्राrभवनातील बास्केटबॉल मैदानात मनपास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय शालेय 19 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धा झाल्या होत्या. विभागीय स्पर्धेत केदारचा सहभाग असलेल्या नाईट कॉलेजच्या संघाने विजेतेपद मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत धडक दिली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत कॉलेजने उपविजेते मिळवले. मात्र स्पर्धेत उत्कृष्ट पासिंगमुळे केदारला महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनने महाराष्ट्र संघ निवड समितीसाठी पुन्हा निमंत्रित केले. त्यानेही महाराष्ट्र संघात स्थान मिळवल्यानंतर प्रशिक्षक अभय चव्हाण यांनी केदारकडेच कर्णधार पद सोपवले. वारणेत झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत केदारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. केदारने 2015 साली प्रशिक्षक होण्याचे ठरवले. डू इट भास्कर अॅकॅडमी स्थापन केली. या अॅकॅडमीच्या माध्यमातून गेली 9 वर्षे तो शिवाजी विद्यापीठातील बास्केटबॉल मैदानात बास्केटबॉलपटू घडवण्याचे काम करत आहे. आपल्या बास्केटबॉलच्या एकुणच जडणघडणीत नाईट कॉलेजचे प्रशिक्षक सुरेश फराकटे, कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे डॉक्टर शरद बनसोडे, यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे केदार अभिमानाने सांगतो.
गेल्या चार वर्षापासून फेडरेशनचा कोच म्हणून कार्यरत...
केदारकडील बास्केटबॉल कौशल्य पाहून महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनने त्याच्याकडे महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदाचे धुरा सोपवली. केदारच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने राजस्थानमध्ये 2022 साली फेडरेशनने आयोजित पश्चिम विभागीय 18 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला बेंगळूरमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रही ठरला होता. या कामगिरीवर खुश होऊन असोसिएशनने केदारकडे महाराष्ट्र वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदाचा धुरा सोपवली. या संघानेही गतवर्षी पंजाबमध्ये झालेल्या लोवर फुलच्या राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष बास्केटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने प्रशिक्षणातील फिबा लेवल थ्री कोचेस क्लिनिक हा कोर्स चेन्नईत कोर्स आयोजित केला होता. या कोर्ससाठी महाराष्ट्र असोसिएशनने केदारला पाठवले होते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर वीस गुणांची लेखी घेतली. यामध्ये केदार उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे केदार आता भारतीय बास्केटबॉल संघावर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळण्यास पात्र ठरला आहे.
-संग्राम काटकर