जिल्हा परिषदेच्या लेखाधिकाऱ्याचे अपहरण करुन मारहाण ! कनिष्ठ लिपिकासह ८ जणांना अटक
स्वयंपाक, मदतनीस मानधनातील अपहार कबूल करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप; अटक केलेल्या संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. स्वयंपाक व मदतनीस यांच्या मानधन निधीतील 23 लाख रूपांच्या अपहार कबुल करण्यासाठी आठ जणांनी आपले अपहरण करून मारहाण केल्याची फिर्याद लेखाधिकारी दीपक बाळासाहेब माने (वय 44, रा. सी. 103 ई वार्ड, रॉयल इनफील्ड अपार्टमेंट, नागाळापार्क) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कनिष्ठ लिपिकासह आठ जणांना अटक केली. या प्रकाराने जिल्हा परिषदेसह शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी इंद्रजित मारुती साठे (वय 38 रा. विनोद चौगुले नगर, प्लॉट नं. 77, कळंबा, ता. करवीर), संग्राम दिनकर जाधव (वय 42, डी वॉर्ड शुक्रवारपेठ, कोल्हापुर), उत्तम आनंदा भोसले (वय 30, रा. पाटपन्हाळा, ता. राधानगरी), प्रकाश महिपती मिसाळ (वय 32, रा. मिसाळवाडी, ता. राधानगरी), संदीप मधुकर ठमके (वय 40, डी वॉर्ड, जुना बुधवारपेठ, कोल्हापूर), महादेव कृष्णा मेथे (वय 46 रा. रामानंदनगर, प्लॉट नं. 30, कोल्हापूर), मंगेश तुकाराम जाधव (वय 42, डी वॉर्ड कुंभारगल्ली, पापाची तिकटी, कोल्हापूर), प्रसाद संजय आमले (वय 31, रा. ई वॉर्ड, बागल चौक, कोल्हापूर) यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली तवेरा कार आणि कोयता जप्त केला आहे. प्रकरणी राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : फिर्यादी दीपक माने हे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात लेखाधिकारी आहेत. संशयित संदीप ठमके हे प्राथमिक शिक्षण विभागात कनिष्ठ लिपिक आहे. तर इंद्रजित साठे यांच्या पत्नी डाटा ऑपरेटर आहेत. त्यामुळे ते सर्व एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 17 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता दीपक माने हे कमला कॉलेज येथे लोकसभा निवडणुकीच्या शासकीय कामात होते. त्यावेळी संशयित इंद्रजित साठे आणि त्याच्या साथीदारांनी माने यांना मानधन निधी अपहार वाटपासंबंधी चर्चा करायची आहे, असे सांगून बाहेर बोलावून घेतले. ते बाहेर आल्यावर संशयितांनी माने यांना जबरदस्तीने उचलून तवेरा कारमध्ये बसवून टेंबलाई मंदिर परिसरात घेऊन गेले. याठिकाणी त्या सर्वांनी माने लाथाबुक्यांनी मारहाण करुन स्वयंपाक व मदतनीस यांच्या मानधन निधीतील 23 लाख रुपयांचा अपहार कबूल कर आणि वरुन आम्हास 10 लाख रुपये दे अन्यथा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. इंद्रजित साठे यांनी कोयत्याच्या मुठीने त्यांना मारहाण केली. या प्रकाराची दीपक माने यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ जणांना अट केली. या सर्व अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे करत आहेत.