कार- ट्रकच्या धडकेत कोल्हापूराचे दोघे ठार ! तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला
तिघे जखमी, मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील
सांगोला प्रतिनिधी
तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची पाठीमागून माल ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना सोमवार दि.७ ऑक्टोंबर रोजी पहाटे ४ वा.च्या सुमारास सोलापूर - सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास जवळ ता. सांगोला येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
सुखदेव बामणे वय ४० व नैनेश कोरे वय ३१ दोघेही रा. नांदणी जि. कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे वय ४२,रा.नांदणी ,सुधीर चौगुले वय ३५ रा.वडगाव ,सुरज विभुते वय २१ रा.कोथळी हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून , त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोड वरुन बाजूला काढून जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९०८ या वॅगनार कार मधून तुळजापूर येथील नवरात्री निमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते दर्शनानंतर त्याच कारमधून पाचजण सोलापूर कडून हायवेने नांदणी जि. कोल्हापूर गावाकडे निघाले होते वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपास वर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या १६ चाकी एम पी -२० झेड एम -९५१८ या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला आहे.