साखर उतारा, निर्मितीत ‘कोल्हापूर’ राज्यात ‘टॉप’
कोल्हापूर :
गळीत हंगामामध्ये नेहमीप्रमाणे यंदाही साखर उताऱ्यामध्ये कोल्हापूर विभाग राज्यात टॉपला राहिला आहे. विभागाचा साखर उतारा 8.54 टक्के इतका आहे. तसेच आत्तापर्यंत सर्वाधिक 13.61 लाख क्विंटल साखरेचे उत्पादनही कोल्हापूर विभागातून झाले आहे. तर क्रशिंगमध्ये पुणे विभाग आघाडीवर असून येथून 17.34 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील गळीत हंगामाने गती घेतली आहे. नागपूर विभाग वगळता राज्यातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर विभागात पूर्णक्षमतेने साखर कारखाने सुरु झाले आहे. साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार 2 डिसेंबरपर्यंत राज्यातील सुमारे 128 साखर कारखान्यांनी 76.86 लाख टन ऊसाचे गाळप केले असून यामधून 5.7 लाख टन इतके साखरेचे उत्पादन घेतले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.48 टक्के इतका आहे.
राज्यात ऊस गाळपामध्ये पुणे विभागा आघाडीवर असून येथील 21 साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत 17.34 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. तर 13.57 लाख क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे. येथील साखर उतारा 7.83 टक्के इतका आहे. ऊस गाळपमध्ये कोल्हापूर विभाग दूसऱ्यास्थानी असला तरी साखर उतारा आणि साखरेच्या उत्पादनामध्ये कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागातील 29 साखर कारखान्यांनी 15.94 लाख टन ऊस गाळप केला असून 13.61 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूरचा साखर उतारा 8.54 टक्के इतका आहे. सोलापूर विभागात 21 साखर कारखाने सुरु असून 14.25 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. 9.57 लाख क्विंटल इतके साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर उतारा 6.85 टक्के इतका राहिला आहे.
राज्यातील गळीत हंगामाची स्थिती पुढीलप्रमाणे:
विभाग कारखाना संख्या ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा
(टनामध्ये) (क्विंटलमध्ये) (टक्केवारीत)
पुणे 21 17.34 लाख 13.57 लाख 7.83
कोल्हापूर 29 15.94 लाख 13.61 लाख 8.54
सोलापूर 21 14.25 लाख 9.57 लाख 6.72
अहमदनगर 20 10.88 लाख 7.45 लाख 6.85
नांदेड 25 10.27 लाख 7.7 लाख 7.5
छ. संभाजीनगर 15 7.22 लाख 4.87 लाख -