कोल्हापूरला येवून समाजस्वास्थ बिघडवणार नाही; गजापूर ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न : इम्तियाज जलील
शुक्रवारी लोकशाही मार्गाने शांततेत घडलेल्या घटनेचा निषेध करण्याचा आवाहन
कोल्हापूर : संतोष पाटील
विशाळगड येथील गजापूर गावात रविवारी झालेली तोडफोडीची घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात येणार असल्याचे कधीही जाहीर केले नाही. सध्या कोल्हापुरात येवून पुन्हा समाजस्वास्थ बिघडवण्याचा आपला कोणताही उद्देश नसल्याचे एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तरुण भारत संवादला प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.
विशाळगड येथील अतिक्रमण हटावण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी (दि.14) चलो विशाळगडचा नारा दिला होता. मात्र या मोहीमेला हिंसक वळण लागले. प्रक्षुब्ध जमावाने विशाळगडापासून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या गजापूर-मुसलमानवाडी या गावात दगडफेक केली. वाहनांची मोडतोड करत घरांचे नुकसान केले. याचे तिव्र पडसाद उमठले. इंडीया आघाडीच्या नेत्यांसह खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी गावाला भेट देवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शासनाने दोन दिवसांपासून विशाळगडावरील ‘ती‘ अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरदारपणे सुरू केली आहे. कोल्हापूरसह राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात या घटनेची दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमठत आहेत. दरम्यान, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल शुक्रवारी (दि. 19) कोल्हापूर द्रौयावर येवून गजापूरला भेट देणार असल्याची माहिती समाजमाध्यमातून पुढे आली. यापार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधून त्यांचा संभाव्य कोल्हापूर दौरा आणि घडलेल्या घटनेबाबत मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर द्रौयावर येणार आहात काय ? याप्रश्नावर जलील म्हणाले, गजापूर येथील घटना घडल्यानंतर मी स्वत: कोल्हापूरला येणार असल्याचे कधीही जाहीर केलेलं नाही. गजापूर येथे घडलेल्या घटनेबाबत शुक्रवारी (दि.19) दुपारी लोकशाही मार्गाने शांततेत निषेध करण्याचे आवाहन केले आहे. मी स्वत: संभाजीनगर येथे दुपारी समाजबांधवासह घटनेचा निषेध करणार आहे. मी तूर्त कोल्हापूरला येण्याचा प्रश्नच नाही. मी कोल्हापुरला येवू नये, अशी विनंती पोलीस प्रशासनाने मला केली. जलील कोल्हापूरला येवू नयेत म्हणून ज्यापध्दतीने पोलीस प्रशासन आणि काही संघटनानी तर्त्पता दाखवली तशीच कार्यवाही विशाळगड परिसरातील घटना घडण्यापूर्वी करण्याची गरज होती.
सामाजिक सलोखा बिघडू नये
कोल्हापुरात विशाळगड परिसरात घडलेल्या घटनेनंतर समाजबांधवांना दिलासा देण्याचा माझा प्रयत्न होता. समाजबांधव एकटे नाहीत, हे मला दर्शवायचे होते. कोल्हापुरात मी आल्यानंतर परिस्थिती अजून चिघळणार असेल तर येणार नाही. कोल्हापुरातील सामाजिक सलोखा अजून बिघडू नये, ही काळजी मी घेईन. - माजी खासदार इम्तियाज जलील
काय आहे प्रकरण ?
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या एक्स अकौंटवरुन जाहीर अवाहन केले होते की, राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्याच्या ठिकाणीशुक्रवारी 19 जुलै रोजी दुपारी तीन वाजता पक्षाने पाठवलेलं निवेदन जिल्हाधिकारी तसेच तालुक्याच्या वरिष्ठ अधिक्रायांना देण्यात यावे. यावरुन इम्तियाज जलील शुक्रवारी कोल्हापूरला येणार असल्याची माहिती पुढे आली. प्रशासनाने यासाठी योग्य ती खबदारी घेण्यास सुरूवात केली. जलील यांच्या कोल्हापूर द्रौयावर हिंदुत्वादी संघटनाही आक्रमक भूमीका घेत ते कोल्हापूरला आल्यास तीव्र विरोध करण्याची भूमीका घेतल्याने जलील यांच्या द्रौयाबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. आता जलील यांनीच कोल्हापूरल येणार नसल्याचे जाहीर केल्याने वादावर पडदा पडणार आहे.