आधी कोल्हापूर नंतर सिंगापूर...कोल्हापूरचे ग्रामवैभव जगाच्या पाठीवर नेण्याची धडपड
सुधाकर काशीद कोल्हापूर
हे कोल्हापूरचे सिंगापूरला चांगल्या नोकरीत होते. सिंगापूर म्हणजे मानवनिर्मित स्वर्गच. त्यामुळे सिंगापूर दर्शनासाठी रिघच. पण हे मात्र सिंगापूरला कंटाळून नव्हे, पण सिंगापूरच्या अंगाने वेगळा, पण अतिशय चांगला असा आपला कोल्हापूर जिल्हा आहे. तेथील डोंगरी भाग तर निसर्गाच्या वरदानाने फुलला आहे. सिंगापुरात हुडकून आपल्यासारखा हिरवागार परिसर दिसणार नाही. मग आपला पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुका पाहायला इतरांनी का येऊ नये म्हणून हे सिंगापूर सोडून आले. कोल्हापुरात त्यांनी ग्रामंती संस्था स्थापन केली. कोल्हापूरचा निसर्ग, डोंगर, जंगल, वाड्या-वस्तीवरील ग्रामीण जीवन दाखवावे, या हेतूने नियोजनपूर्वक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आणि आज त्यांचा हा उपक्रम देशपातळीवर पोहोचला आहे. कोल्हापूरचे ग्रामीण वैभव या एका माणसाने जगासमोर आणले आहे.
हे करून दाखवणारे आहेत कृष्णराव माळी. त्यांना कोल्हापूरचा खूप अभिमान. सहल किंवा पर्यटनाच्या निमित्ताने ते देश-विदेशात खूप फिरले. सिंगापुरात तर बारा वर्षे राहिले. पण प्रत्येक वेळी त्यांना आपल्या कोल्हापूर जिह्यातील ग्रामीण भागाची हटकून आठवण यायची. परदेशातील पर्यटनवृद्धीसाठी फोटोत, डॉक्युमेंटरी जाहिरातीत एखादा भाग खूप ताकतीने दाखवतात आणि पर्यटकांना खेचून घेतात. पण आपल्याकडे मुक्त हस्ताने निसर्गाचे वरदान आहे. मग आपण का ते दाखवत नाही? छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर पन्हाळ्dयाजवळच्या मसाई पठारासारखे सलग लांब, रुंद हिरवेगार पठार देशात कोठे नाही. ते आपण जगाला का दाखवत नाही, हे शल्य त्यांच्या मनात होते. कारण मसाईच्या पठारावर एका बाजूला प्राचीन बौद्ध लेण्याची जोड आहे. दाजीपूर,गगनबावडा, आंबा, विशाळगड, पारगाव, रांगणा असले सदाबहार जंगल आपल्या आसपास गच्च भरलेले आहे. अगदी कोल्हापूर शहरापासून 70-80 किलोमीटरवर पाच घाट-माथे आहेत. नजर भिरभिरणाऱ्या अशा खोल दरीत वसलेला कोकण पाहायची फक्त कोल्हापूरकरांना संधी आहे.
गव्यांचा मुक्त वावर आहे. निसर्गाचे वैभव असलेले धबधबे, जलसाठे, नागमोडी वळणे घेत वाहणाऱ्या नद्या आहेत आणि या साऱ्या हिरव्या कोंदणात अनेक छोट्या-छोट्या वाड्या-वस्त्या वसल्या आहेत. कौलारू घरे, सारवलेले अंगण, ऐसपैस व्हरांडे, दारात तुळस, जास्वंदी, सदाफुली, कर्दळी. हाताला येतील अशी करवंदे, जांभळे, आंब्याची झाडी आहे. छोटी-छोटी मंदिरे, त्यात शेंदूर लावलेले देवरूपी दगड, त्यावर वाहिलेली जास्वंदीची फुले, अगरबत्ती कापूर लावून काळवंडलेले कोपरे, कोणीतरी श्रद्धेने बांधलेली तोरणे असे सुंदर वातावरण आहे.
याशिवाय नाचणीची भाकरी, आंबील, रानभाज्या, पापड्या, कुरवड्या, सांडगे, मोठ्या तांदळाचा भात, लोणची, दूधदुभते, गावठी कोंबड्यांची अंडी, मांसाहार असा फक्कड सात्विक आहार आहे. जो बाहेर पर्यटनाला गेले तर क्वचितच मिळतो. इथे अंगणात घोंगड्यावर झोपून काढलेली रात्र तर विशाल अशा विश्वात आपण किती इवलेसे आहोत, याची क्षणाक्षणाला जाणीव करून देणारी आहे.
नऊवारी साड्या नेसणाऱ्या माता, भगिनी, कपाळावर ठसठशीत कुंकू, कानात फुले, कुड्या, बाल्या, गळ्यात ठुशी, बोरमाळ, हातात डझन-डझनभर हिरवी काकणे, पाटल्या, पायात मासोळ्या, जोडव्या, हातावर गोंदलेली शुभ प्रतीके असा निसर्ग वैभवाशी साजेसा वावर माता-भगिनीचा आहे. डोक्यावरून पाणी आणताना कधी घागर डचमळत नाही. पाण्याचा एक थेंब बाहेर येत नाही, इतका जगण्याचा समतोल साधण्याची ताकद आपल्या माता-भगिनीत आहे.
या साऱ्या वैभवाचे एक प्रतीक म्हणून शाहूवाडी तालुक्यातील गोठणे हे 25 घराचे गाव श्री कृष्णराव माळी यांनी जपले आहे. शाहूवाडीच्या पुढे आंब्याला जाताना वारुळ गावापासून तीन किलोमीटरवर गोठणे गाव आहे. तेथे पर्यटक हे सारे ग्रामजीवन अनुभवू शकतात. जात्यावर दळण करू शकतात. चिखलातल्या वस्तू बनवू शकतात. मचाणावर राहू शकतात. चुलीसमोर बसून भाजी-आमटीला फोडणी टाकू शकतात. भात पेरणीच्या काळात तर भाताची लावण करू शकतात. बैलगाडीतून फेरफटका मारताना ग्रामीण जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतात. आता तर तेथील सात घरात गणेशमूर्ती प्रतिष्ठापित आहेत. प्रत्येकाच्या घरात रोज 20 मिनिटांची आरती असते. 50 ते 60 जण प्रत्येकाच्या घरात आरतीला जातात. प्रसाद खातात. एकमेकाचा शेजार धर्म आणि नाती सांभाळतात. हे सारे पहिल्यांदा कोल्हापुरात राहणाऱ्या कोल्हापूरकरांनी अनुभवावे. मग केरळ, सिंगापूरवर बोलावे, अशी कृष्णराव माळी यांची अपेक्षा आहे. आपल्या जिह्याचे वैविध्य, सौंदर्य आपणच पाहिलेले नाही, ही त्यांची खंत आहे. पण हे चित्र बदलण्याची त्यांची सर्वांच्या सहकार्याने अविरत धडपड सुरू आहे.