महारेराच्या नियमांचे कोल्हापूरकरांकडून पालन
कोल्हापूर :
बांधकाम व्यवसायामध्ये पारदर्शंकता असावी, यासाठी राज्य सरकाने महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणची (महारेरा) स्थापना केली. या महारेराच्या कायद्याचे पालन न करणाऱ्या राज्यातील 1950 बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांची नोंदणी नुकतीच स्थगित केली. या यादीमध्ये कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांचा समावेश नाही. महारेरांच्या कारवाईत काही विकासकांची बँक खातीही गोठवली आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरातील बांधकाम व्यावसायिकांची अधिक संख्या आहे.
बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यामध्ये पारदर्शंकता आणण्यासाठी महारेराची स्थापना झाली. ग्राहकांचे संरक्षण, वेळेत ताबा देणे, तसेच खरेदीदारांचे संरक्षण होऊन एक शिस्त लागावी म्हणून महारेरा काम करत आहे. यासाठी महारेराच्या वेबसाईटवर विकासकांची नोंद करून, आपल्या प्रकल्पाची माहिती वेळोवेळी नोंद करून याची माहिती महारेराला द्यावी लागते. पण नुकतेच महारेराने राज्यातील 1950 बांधकाम प्रकल्पांची नोंदणी स्थगिती केली आहे. महारेराच्या वेबसाईटवर माहिती न दिल्याने राज्यातील अनेक विकासकांना नोटिसा काढल्या होत्या. यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. 5324 विकासकांनी नोटिसला प्रतिसाद दिला. नोटीसचे पालन न केलेल्यांमध्ये 10773 बांधकाम प्रकल्पांचा समावेश होता. यापैकी 3517 ओसी सादर केली. तर 524 विकासकांनी प्रकल्पाच्या बांधकामासाठी मुदतवाढ मागितली आहे. उर्वरित 1283 विकासकांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. तर 1950 प्रकल्पांची नोंदणी स्थगित केली आहे. महारेराच्या नोटिसाला 3499 विकासकांनी कोणतेच उत्तर दिलेले नसल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.
- कोल्हापुरात कोणावर कारवाई नाही
महारेराच्या वेबसाईटवर राज्यातील 1950 बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित केली. याबाबत वेबसाईटवर माहिती घेतली असता, कोल्हापुरातील व्यावसायिकावर कारवाई केलेली नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मोठ्या शहरातील व्यावसायिकांवर कारवाई केली आहे.
-आदित्य बेडेकर, बांधकाम व्यावसायिक, क्रिडाई कोल्हापूर महारेरा विभाग