Kolhapur Breaking : राधानगरी धरण १०० टक्के भरले; १ दरवाजा उघडला ! धरणातून 2928 क्युसेकचा विसर्ग सुरू
जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन 100% धरणामध्ये पाणीसाठा झाला आहे. वाढत्या पाण्यामुळे आता राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा खुला झाला असून त्यातून एकूण 1425 क्युसेकचा विसर्ग सुरू झाला आहे.
जिल्ह्यात संततधार आणि मुसळधार पावसाची झोड सुरू आहे. राधानगरी तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणामध्ये पाण्याचा साठा चांगलाच वाढला आहे. धरणाच्या आसपास असणाऱ्या नदी, नाले ओढे यामधून पाण्याचा ओघ राधानगरी धरणात वाढला असून वाढत्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 99% वर पोहोचला आहे.
राधानगरी धरणामध्ये चारी बाजूने येणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे पाण्याच्या साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असून त्यामुळे धरणाच्या दरवाजांवर दाब वाढला आहे. दाबामुळे आता धरणातील सहाव्या क्रमांकाचा एक दरवाजा उघडला असून त्यातून 1425 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तसेच धरणाच्या पॉवर हाऊस मधून येणाऱ्या 1500 क्युसेकचा विसर्ग असा मिळून राधानगरी धरणातून एकूण 2928 चा विसर्ग सुरू आहे. 6 व्या क्रमांकाचा दरवाजा उघडल्यामुळे राधानगरी पाणलोट क्षेत्रामध्ये नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून राधनगरी धरणा पाणलोट क्षेत्रातील नद्यांच्या काठावर असणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.