Vari Pandharichi 2025: पुईखडीवर रंगला रिंगण सोहळा, विठ्ठल भक्तांची मांदियाळी
दिंडी पुईखडीवर आल्यानंतर ‘विठूमाऊली’च्या गजरात गोल रिंगण सोहळा उत्साहात झाला
कोल्हापूर : पावसाच्या सरींत अभंग, भजनांबरोबरच ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’च्या गजरात रविवारी रौप्यमहोत्सवी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडी अलौकिक अशा विठ्ठल भक्तीची नांदी ठरली. आषाढी एकादशीला आयोजित या दिंडीत प्रथमच नवा चांदीचा रथ प्रमुख आकर्षण ठरला.
रथासोबत शहर आणि परिसरातील आजूबाजूच्या गावांसह विविध तालुक्यांमधील 40 हजारांवर वारकरी, भाविक पावसाच्या सरी झेलत नंदवाळकडे मार्गक्रमण करत होते. त्यांनी विठ्ठल भेटीच्या ओढीने टाकलेल्या एक-एक पाऊलावर नामजप करत दिंडी मार्गात जणू भक्तिरसाला उधाण आले. दिंडी पुईखडीवर आल्यानंतर ‘विठूमाऊली’च्या गजरात गोल रिंगण सोहळा उत्साहात झाला.
पुईखडीवर माऊली आणि संग्राम या अश्वांनी रिंगणातून सात फेऱ्या मारुन रिंगण सोहळा पूर्ण केला. यावेळी पुईखडीवरील मैदान फक्त आणि फक्त रिंगण सोहळ्यासाठी आरक्षित केले जाईल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केले.
दरम्यान, श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्ट आणि जय शिवराय फुटबॉल aप्लेअर तऊण मंडळ आयोजित दिंडी मिरजकर एकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सुरु झाली. सकाळी मंदिराजवळ फुलांनी सजवलेल्या नव्या चांदीच्या रथामध्ये चांदीची पालखी ठेवली.
पालखीत विराजमान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची मूर्ती, ज्ञानेश्वरी आणि माऊलींच्या पादुकासह रथाचे पुजन पुष्कराज क्षीरसागर, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक किरण माने, अॅङ राजेंद्र किंकर, माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुहास सोरटे, आर्केटेक्ट अमित कामत यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर विठ्ठल नामाचा जप करत दिंडी आणि रथाने प्रतिपंढरपूर नंदवाळकडे प्रयाण केले. सोबत दिंड्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, मृदंगधारी, विणेकरी, टाळकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, पारंपरिक वाद्ये, विठ्ठल भक्त, भजनी मंडळांनीही नंदवाळकडे प्रस्थान केले. वाटेत दिंडीतील सर्व जण फुगड्या घालत आणि फेर धरत हरीनामाचा जप करत होते. दिंड्या, पताका फडकावत होते.
दिंडी बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौकमार्गे प्रयाण करत असतानाच विविध मार्गाने वारकरी आणि भाविक दिंडीत सहभागी होत होते. सर्वजण खंडोबा तालीमजवळ पोहोचल्यानंतर तेथे टाळ, मृदंगाच्या साथीने ‘माऊली माऊली’च्या गजरात उभे रिंगण झाले.
दिंडीने दुपारी जुना वाशी नाका, क्रशर चौक, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, नवीन वाशी नाका मार्गे पुईखडीवरील मैदान गाठले. पुईखडीकडे जाताना अनेक मार्गानी वारकरी, भाविक स्वयंस्फुर्तीने दिंडीत सहभागी झाले. त्यांच्या साक्षीने पुईखडीवर भव्य रिंगण सोहळा झाला.
आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पालखी, रथासह माऊली, संग्राम या अश्वांचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, महापालिका शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपअभियंता महादेव फुलारी आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पोवार उपस्थित होते.
पुजनानंतर माऊली आणि संग्राम अश्वांनी रिंगणातून सात फेऱ्या मारून रिंगण सोहळा पूर्ण केल्यानंतर भाविकांनी विठ्ठल भेटीच्या ओढीने राधानगरी रोड, वाशी मार्गे दिंडीसोबत नंदवाळमधील विठ्ठल मंदिराकडे प्रयाण केले. दिंडी नंदवाळमध्ये गेल्यानंतर ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले. श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्टच्यावतीने विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले.
वाहतुकीला शिस्त लावल्याने दिंडी मार्ग सुरळीत
दिंडी मार्गात 300 पोलीस आणि वाहतूक पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तैनात होते. त्यांनी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिंडी मार्गावर वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम केले. त्यामुळेच दिंडीत वाहतुकीचा व्यत्यय झाला नाही.
दिंडी मार्गावर ठिकठिकाणी उपवासाच्या पदार्थांचे वाटप
दिंडीतील सहभागी वारकरी, भाविकांसाठी मंडळांनी उपवासाचे पदार्थ वाटपासाठी मंडप उभारले होते. मंडपातून बहुतांश मंडळांनी 100 ते 500 डझन केळी, कित्येक हजार राजगिरा लाडू आणि 4 ते 5 मोठी पातेली भऊन खिचडीचे वाटप केले. अनेक स्टॉलवऊन चहा, दुधाचेही वाटप करण्यात आले.
आणखी 30 किलो चांदी देणार : आमदार क्षीरसागर
आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेल्या 70 किलो चांदीपासून खास दिंडीसाठी नक्षीदार रथ तयार केला आहे. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ ट्रस्टच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्षीरसागर यांनी, रथामध्ये आणखी चांदी काम करावे लागणार आहे. ते पूर्ण करण्यासाठी लवकरच 30 किलो चांदी आपण देणार आहोत, असे सांगितले.
इच्छुकांनी उभारले स्वागत फलक
दिवाळीनंतर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन शिवाजी पेठ, सानेगुरुजी वसाहत, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, राजोपाध्येनगर, आपटेनगर आणि नवीन वाशी नाका येथील 50 हून अधिक इच्छुकांनी सानेगुरुजी वसाहत रोडच्या दुतर्फा दिंडीचे स्वागत करणारे मोठे फलक लावले होते. नेतेमंडळीसोबत आपली छबी असलेल्या कमानी उभारल्या होत्या. इच्छुकांनी विविध मंडळांना सोबत घेत भाविकांना केळी, खिचडी, राजगिरा लाडूचे वाटप केले.