शासकीय विश्रामगृहाच्या नुतनीकरणाचा निधीत महाविकासचा हात; बांधकाम मंत्री यांच्या हस्ते होणार लोकार्पण
कोल्हापूर : प्रतिनिधी
शासकीय विश्रामगृहाच्या नुतनीकरण कामाचे लोकार्पण व जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांचे आभासी पध्दतीने लोकार्पण व भूमिपूजनाचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे उद्या, गुरुवारी होत आहे. शासकीय विश्रामगृहातील विविध १४ सुटस्साठी आवश्यक सुधारणा करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी २६ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद केली होती. महाविकास आघाडीच्या काळात केलेली निधीची तूरतूद आणि केलेल्या या विविध कामांचे उद्घाटन आता महायुतीच्या काळात होत आहे.
आ. सतेज पाटील पालकमंत्री असताना ताराबाई पार्कातील राणी इंदुमतीदेवी सर्कीट हाऊसयेथील विविध विकासकामांसाठी २०२०-२१ मध्ये जिल्हा नियोजन मंडळातून २६ कोटी १७ लाख ७० हजार रुपयांची तरतूद केली होती. दरबार हॉलसाठी ५१ लाख ९० हजार, छत्रपती शाहू सभागृह सुधारणा करण्यासाठी ४९ लाख ६८ हजार रुपये, बगीचा सुधारण्यासाठी ५० लाख रुपये, जुने सर्कीट हाउसच्या १२ व १३ सुट, भांडारगृह अतिरिक्त बांधकाम, पारगड आणि रांगनगड सुट, कुंभी व कासारी सुट, वेदगंगा व भोगावती, ताम्रपर्णी व घटप्रभा, पंचगंगा व जांभळी, धामणी व हिरण्यकेशी, हस्त व श्रवण, शयरू व उत्तरा, पुर्वा व रोहिणी आदी १८ सुट आणि इतर कामासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयाची तरतूद तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती.
हा उद्घाटन सोहळा दुपारी चार वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथील दरबार हॉलच्या नूतनीकरणाअंतर्गत स्थापत्य कामास 38 लाख व विद्युत कामास 12 लाख अशी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातून दरबार हॉलमधील मुख्य टेबल, वॉल पॅनलिंग, सिलिंग, फरशीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच पूर्वी ऑइल पेंट ने रंगविलेल्या जुन्या लाकडी स्तंभांना पॉलिश करुन त्याचे फिनिशिंग करण्यात आले आहे. याबरोबरच याठिकाणी अद्ययावत रोषणाई व वातानुकुलीत यंत्रणेचे कामही करण्यात आले आहे.
तसेच 50 लाख रुपयांच्या निधीतून मुख्य विश्रामगृहा समोरील बगिच्याची सुधारणा करण्यात आली असून यात लेवलिंग, बगीचामध्ये माती, विविध झुडपे, गार्डन लाइट्स आदी कामे करण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.