कर्नाटक तुकडीसह कोल्हापूर पोलिसांचे संचलन
विधानसभा निवडणूक बंदोबस्तासाठी जिह्यात बाहेरुन सुमारे 900 पोलीस
कोल्हापूर :
पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारावर वचक राहून, विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी आणि मतदारामध्ये विश्वासार्हता वाढीस लागावी. या उद्देशाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संवेदनशील भागात संचलन करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सोमवारी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून सशस्त्र संचालन करण्यात आले. या संचलनामध्ये कोल्हापूर पोलिसांच्याबरोबर बंदोबस्तासाठी आलेल्या कर्नाटक राज्य पोलीस दलातील सुमारे 270 वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमुख सहभाग होता.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी हद्दीतील पोलीस संचलनास दसरा चौकातील शहाजी कॉलेज या ठिकाणाहून सुऊवात केली. हे संचलन जुने ट्रॅफिक ऑफिस-सीपीआर चौक-सिद्धार्थ नगर-जुना बुधवार पेठ तालीम मंडळ-सोन्या मारुती मंदिर चौक-मणेर मस्जीद चौक-कोल्हापूर महानगरपालिका-मराठा बँक चौक-अकबर मोहल्ला-छत्रपती संभाजी महाराज चौक अशा संवेदनशील परीसर, संमिश्र वस्ती आदी ठिकाणी करीत, परत दसरा चौक असा करण्यात आले. या संचलनामध्ये लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कडील 3 पोलीस अधिकारी, 10 पोलीस अंमलदार, कर्नाटक राज्य सशस्त्र पोलीस 1291 बटालियन क्रमांक दोन बेळगाव यांचेकडील 4 पोलीस अधिकारी व 61 पोलीस अंमलदार असे सहभागी झाले होते. तर शाहूपुरी पोलिसांनी सदर बाजार, विचारे माळ, कदमवाडी चौक, कपूर वसाहत, कनाननगर, नागाळा पार्क, माकडवाला वसाहत, ताराराणी चौक परिसरात संचलन केले. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील 1 अधिकारी आणि 38 जवानांची तुकडी, तसेच शाहूपुरीचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर, 4 उपनिरीक्षक आणि 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या संचलनामधून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भौगोलिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती, गुन्हे, कायदा-सुव्यवस्था याबाबत माहिती देण्यात आली. तसेच विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकराची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे, असा इशारा दिला.