कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई ! अट्टल घरफोड्यांना अटक; तब्बल ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत कर्नाटकातील दोन अट्टल घरफोड्यांना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ८६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कर्नाटकातून कोल्हापूरात येऊन गावाशेजारी बंद असलेली घरे फोडून सोन्या चांदीवर डल्ला मारणाऱ्या या दोघांवर पोलीस काही दिवसांपासून मागावर होते.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात घरफोड्यांचे सत्र वाढले आहे. त्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर पोलिसांकडून याचा मागोवा घेतला जात होता. चोरीची पद्धतीवर माग काढण्यात आल्यावर हे प्रकार कर्नाटकांतील एका आंतरराज्य टोळी कडून करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं.
दरम्यान, आज पोलिसांना कर्नाटकातील दोन युवक मुरगूडमध्ये चोरीचा मुद्देमाल विकण्यास येत असल्याची माहीती खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुरगूड शहरामध्ये सापळा रचला. यावेळी राजू कित्तूरकर रा. इंदिरानगर, हालशी, ता. खानापूर. हा संशयास्पद रित्या त्या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. शेवटी रिमांडवर घेतल्यावर त्यांने त्याचा साथीदार महादेव नारायण धामणीकर रा. कित्तूर, ता. खानापूर, जि. बेळगाव याच्या साथीने घरफोड्या केल्याचं कबुल केलं. त्यानुसार पोलिसांनी महादेव धामणीकर यास कर्नाटकात ताब्यात घेतलं.
अधिक माहीतीनुसार हे दोन्ही गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते दोघेही कर्नाटकातून कोल्हापूरात येऊन प्रथम दुचाकी चोरी करायचे. त्यानंतर रात्री घरफोडी करून चोरलेली दुचाकी महाराष्ट्र कर्नाटक हद्दीत सोडून देत होते. त्यानंतर सोने किंवा ऐवज वाटून घेऊन बसने आपापल्या गावी जात होते.
आज पोलिसांनी त्यांच्या कडून फेडरल बँक शाखेत तारण ठेवलेल्या २३३ ग्रॅंम आणि महादेव धामणीकर य़ाच्याकडील ६९४ ग्रॅम सोन्याचे आणि ४५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यासह एकूण १२०० ग्रॅम सोन्याचे आणि १४३० ग्रॅम चांदीचे दागीने जप्त केले. आरोपी महादेव कित्तूरकर याने मुत्थुट फिनकॉर्प खानापूर याच्याकडे तारण ठेवलेले दागिने त्याच प्रमाणे गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकली आणि इतर वस्तू असा ८६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुत्थुट फिनकॉर्प खानापूर याच्याकडे ठेवण्यात आलेले दागिने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.