महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिये येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण खून

11:43 AM Aug 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur News Shiye
Advertisement

अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करून, दगडाने डोके ठेचून, एक डोळा बाहेर काढला; नराधमाने मृत मुलीचा ओढ्यात दिला फेकून; संशयीत नराधमाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती; पिडीत मृत अल्पवयीन मुलीच्या नात्यातील एका तरूणासह सात जण चौकशीसाठी ताब्यात; घडल्या घटनेवरून जिह्यात संतापाची लाट; शिवसेनेकडून (उबाठा गट) मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा मागणीसाठी बोंब मारो आंदोलन

Advertisement

कोल्हापूर, पुलाची शिरोली प्रतिनिधी
त कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे डॉक्टर महिलेवर अत्याचार करून, तिचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटनेनंतर बदलापूर (ठाणे) येथील दोन शाळकरी अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संशयीत नराधमांच्या विरोधात उद्रेक निर्माण झाला आहे. या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशाच प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती शिये (ता. करवीर) येथे घडली असून, या गावातील एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत, नराधमाने तिचे डोके दगडाने ठेचून, अत्यंत शांत डोक्याने निर्घुणपणे खून करून, त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावानजीकच्या ओढ्यातील पाण्यात फेकून दिल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेनंतर कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिह्यात संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

मृत अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय कुटुंब कामानिमित्याने सुमारे पाच वर्षापासून शिये परिसरात राहण्यास आले असून, हे कुटूंब सध्या या परिसरातील एका उपनगरात भाड्याच्या खोलीत राहत आहे. त्यांना तीन मुली व दोन मुले आहेत. त्यांची मोठी मुलगी 10 वर्षाची आहे. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हे परप्रांतीय दाम्पत्य कामानिमित्याने पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कारखान्यात आले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काम संपताच हे दाम्पत कामावरुन घरी परत आले. त्यावेळी त्यांनी थोरली 10 वर्षाची मुली घरी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी शेजारी राहत असलेल्या नागरिकांच्याकडे तिच्याबाबत विचारपुस केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मुलीच्या मामाने ती दुपारीच घरातून बाहेर गेल्याचे सांगितले. त्यामुळे मुली आई-वडीलांनी परिसरात शोध सुरू केला. पण तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे मुलगी बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार तिच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्रीच पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दिली.

या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवून, पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह तात्काळ मुलगी ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाली. त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक आणि नागरिकांच्या मदतीने बेपत्ता मुलीचा शोधकार्य सुरू केले. तरीही तिचा ठावठिकाण लागेना. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी यांनी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. या माहितीवरून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे एक पथक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत बेपत्ता मुलीचा शोध घेतला. तरीदेखील बेपत्ता मुलगी मिळून आली नाही. गुरुवारी सकाळी पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीची शोध मोहिम हाती घेत, मुलीच्या शोधासाठी कोल्हापूरहून श्वान पथकाला पाचारण केले. थोड्याच वेळात श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकातील श्वानला बेपत्ता मुलीच्या घरातील वस्तूंचा वास दिला. त्यानंतर श्वानाने घरापासून थोड्या अंतरावर शिये गावालगतच्या पटकुडी ओढ्यालगतच्या काशिद नामक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बेपत्ता मुलीचा माग दाखविला. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यानां पटकुडी ओढ्याच्या पाण्यात बेपत्ता मुलीचा मृतदेह आणि लगतच्या रूसाच्या शेतात तिचे चप्पल व अन्य साहित्य सापडले.

मुलीवर लैगिंक अत्याचार
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या घटनेची माहिती कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅब दिली. त्यावरून फॉरेन्सिक लॅबचे एक पथक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने घटनास्थळाची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पीटलकडे पाठविला. सीपीआरमध्ये या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी त्या बेपत्ता मुलीवर अज्ञात नराधमाने लैंगिक अत्याचार करून, तिचे डोके दगडाने ठेचून, तिचा एक डोळा देखील बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

परप्रांतीय तरूण ताब्यात
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून, तिचा शांत डोक्याने दगडाने ठेचून निर्घुणपणे खून केल्याची घटना पोलीस तपासात उघड होताच. पोलिसांनी सात परप्रांतीय तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पिडीत मृत अल्पवयीन मुलीच्या जवळच्या एका नातेवाईकांचा समावेश आहे, अशी माहिती या घटनेचा तपास करणाऱ्या पथकातील एका पोलीस अधिकाऱ्यांने दिली.

वीस वर्षानंतर पुन्हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
शिये परिसरातील श्रीरामनगरमध्ये वीस वर्षापूर्वी एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेनंतर शिये परिसरात ‘त्या’ नराधमाविरोधी संतापाची मोठी लाट उसळली होती. या वीस वर्षाच्या प्रकरणानंतर पुन्हा गुरूवारी दुपारी शिये परिसरात परप्रांतीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, तिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना समोर आल्याने, एकच चर्चा केली जात आहे.

शिये परिसरात हळहळ
एका दहा वर्षाच्या परप्रांतीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत, तिला ठार मारण्यात आल्याचे गुरूवारी समोर आले. शिये परिसरातील नागरिकांच्यात विशेषत: महिला आणि मुलीच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच बेपत्ता मुलीचा मृतदेह पाहताच उपस्थित नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.

बदलापूर नंतर कोल्हापूर दुर्दैवी
बदलापूर (जि. ठाणे ) येथे पाच दिवसापूर्वी एका शाळेतील शिपाईने दोन लहान मुलीच्यावर अत्याचार केला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी कोल्हापूर जिह्यातील शिये (ता. करवीर) परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचर करून, तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेतील संशयीत नराधमाला पोलिसांनी शोध घेवून, त्याला अटक करावी. या मागणीसह गेल्या काही दिवसापासून राज्यात महिला आणि मुलींच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याने, राज्यातील मुलींचा आणि महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यांची दखल घेवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरीत राजीनामा द्यावा. याकरीता शिवसेनेच्या (उबाठा गट) वतीने सीपीआर हॉस्पीटल चौकात बोंब मारो आंदोलन करीत, काही काळ ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेनेचे (उबाठा गट) उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

कडक पोलीस बंदोबस्त
कोलकाता, बदलापूर, येथील लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असताना शिये येथे अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करून, तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिह्यातून संताप व्यक्त केला जात असल्याने, या घटनेनंतर संशयीत नराधमांच्या विरोधात उद्रेक निर्माण होवून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरीता कोल्हापूर शहरासह जिह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नराधम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
शिये परिसरातील परप्रांतीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, तिचा खून केला आहे. या घटनेचा पोलिसांच्याकडून कसून तपास केला जात आहे. तपासादरम्यान पोलिसांना मृत पिडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तिला घेवून एक तरूण घेवून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजवरून पोलिसांनी त्या तरूणाचा शोध सुरू केला. तसेच त्या फुटेजमध्ये चालत जाणाऱ्या संशयीता सारखा चालणाऱ्या परप्रांतीय तरूणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Advertisement
Tags :
kolhapur newsminor girl sexually assaulted murderedMurderedShiye
Next Article