महापुरामुळे चाऱ्याची टंचाई चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागतेय तारेवरची कसरत
अनिल पाटील सरुड
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि संततधारेमुळे नद्या, नाल्यांना पुर आले. अद्यापी जिल्ह्याच्या काही भागात पुरस्थिती आहे. नदीकाठचं शिवारं पाण्याखाली असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातील वारणा व कडवी नद्यांना आलेल्या महापुरामुळे या नद्यांकाठाशेजारील सुमारे 75 टक्के क्षेत्रामधील पिके पाण्याखाली गेली आहेत. परिणामी परिसरातील या दोन्ही नदीकाठच्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चारा उपलब्ध करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना आसपासच्या गावात व पै पाहुण्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
शाहूवाडी तालुक्यात बहुतांश शेती वारणा व कडवी नदीकाठावरच आहे. येथील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून याच क्षेत्रातील ऊस पिकातील ऊसाचा हिरवा पाला व मळी, रानातील गवतांचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर केला जातो. 15 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा व कडवी नद्यांना महापूर येऊन या दोन्ही नद्यांचे पुराचे पाणी नदीकाठच्या परिसरात विस्तारल्याने नदीकाठावरील पिके गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला आहे. येथील शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जेथून उपलब्ध होईल तेथून चारा उपलब्ध करण्यासाठी धडपडत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी पावसाळ्यासाठी वाळलेले गवत, भाताचे पिजांर, मक्याचा कडबा अशा सुक्या चाऱ्याची साठवण करून ठेवली होती. परंतु महापुरामुळे गेल्या 15 दिवसात हाच सुका चारा जनावरांना घातल्याने साठवण करून ठेवलेला सुका चाराही संपत आला आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे अजिबात सुका चारा उपलब्ध नाही, त्यांना ओले हिरवे गवत, ऊसाचा पाला, हत्ती गवत आदी चाऱ्यासाठी डोंगर तसेच माळरानावरील परिसरात भटकंती करून चारा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
सध्या पावसाचा जोर कमी असला तरी वारणा व कडवी नदीकाठची पिके अद्यापी पाण्याखाली आहेत. पूर संथ गंतीने ओसरत आहे. त्यामुळे पाणी नदीपात्रात जाण्यास अजून चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार, अशी स्थिती आहे. पुराच्या पाण्याखाली गेलेली बहुतांश क्षेत्रातील पिके कुजल्याने पूर ओसरल्यानंतरही चाऱ्याची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी यापुढेही शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.