Kolhapur News : इचलकरंजीत ढोल ताशांच्या निनादात शंभूराजेंना मानवंदना !
शंभू तीर्थाचे भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात
इचलकरंजी : श्री शंभू तीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त रविवारी इतिहास, परंपरा आणि श्रद्धेने भरलेला भव्य कार्यक्रम पार पडला. विविध ढोल पथक, ताशा पथक आणि ध्वज पथकांनी तब्बल एक हजार ढोल-ताशांच्या निनादात हजारों शंभू भक्तांच्या साक्षीने छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पण सोहळ्यानिमित्त शहरात विविध धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दररोज होत असलेल्या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. रविवारी झालेल्या कार्यक्रमात स्वयंभू, शिव शंभू, ब्रह्मांडनायक, छत्रपती शासन, केसरी, हिंदवी स्वराज्य, शिवप्रेमी आणि वाद्य संस्कार यांसारख्या पथकांनी भाग घेतला. युवक, युवती आणि महिलांनी पारंपरिक ढोल वादनाची प्रात्यक्षिके सादर करून वातावरण भारावून टाकले. तसेच कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज मर्दानी खेळ पथकाने विशेष प्रस्तुती देत प्रेक्षकांची दाद मिळवली.
प्रारंभी स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन यांनी ध्वज पूजन केले. आमदार राहुल आवाडे यांनी ढोल पूजन, तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडले. यावेळी रवींद्र माने, मदन कारंडे, सागर चाळके, तानाजी पोवार, संजय कांबळे, सुहास जांभळे, संजय तेलनाडे, प्रकाश मोरबाळे आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शंभू तीर्थपासून महात्मा गांधी चौकापर्यंत संपूर्ण परिसर जनसागराने फुलून गेला होता.
याप्रसंगी माय फाउंडेशनतर्फे १० हजार लाडू प्रसादाचे वितरण, तर विविध संघटनांनी पाणी व्यवस्थेची सोय केली होती. कार्यक्रमाचे नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांनी केले. तर सकाळच्या सुमारास धर्म रक्षा महायज्ञात हजारो नागरिकांनी सहभाग घेत धर्मरक्षण, राष्ट्रभक्ती आणि गौसेवेची शपथ घेतली. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील महायज्ञ यांच्या हस्ते पार पडला, तर महायज्ञाचा समारोप आमदार राहुल आवाडे यांनी केला.
या महायज्ञाच्या आयोजनात ब्राह्मण युवा मंच, इचलकरंजीचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी गौरी नावाच्या गाईचे पूजनही करण्यात आले.
या संपूर्ण सोहळ्याने इचलकरंजी शहरात धर्म, पराक्रम, संस्कृती आणि शिवभक्तीची ऊर्जा पुन्हा जागवली.