Breaking : 'कोल्हापूर' लोकसभेच्या जागेवरून चर्चेला उधाण; महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याची जोरदार चर्चा
- पक्षीय पातळीवरून मात्र शिक्कामोर्तब नाही; जागा मिळाल्यास काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती यांचे नाव आघाडीवर;
कृष्णात चौगले कोल्हापूर
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये काही लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपावरून अद्याप तिढा कायम आहे. यामध्ये कोल्हापूरची जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेकडून ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसची ताकद सर्वाधिक असल्यामुळे ही जागा कॉंग्रेसला सोडण्याची जोरदार मागणी केली आहे. तर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा पुर्वाश्रमीच्या शिवसेनेच्याच आहेत, असा प्रबळ दावा उबाठा गटातील प्रमुख नेतेमंडळीसह स्वतः उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तरीही कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली असून श्रीमंत शाहू छत्रपती हे उमेदवार असल्याची जोरदार राजकीय चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात रंगली होती.
गेल्या काही वर्षांत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेचा दबदबा होता, पण गतीमान राजकीय फेरबदलानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही विभाजन झाले, त्यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली. परिणामी सद्यस्थिती पाहता महाविकास आघाडीमधील 'शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेनेकडे जिल्ह्यात प्रबळ नेतृत्वच उरलेले नाही. तरीही ठाकरे नावाचा वलय आणि शरद पवार नावाचे राजकीय विद्यापीठ महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे सामान्य जनतेचा कौल आपल्या मिळेल असा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अंदाज आहे.
चेतन नरके यांचा मुंबईत तळ अन् पायाला भिंगरी
गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी महानिकास आघाडीतून म्हणजेच शिवसेनेकडून (उबाठा गट) उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची भेट घेतली असून आपल्याला उमेदवारी दिल्यास आपण कशा पद्धतीने निवडूण येऊ शकतो याचा लेखाजोखा त्यांनी त्यांच्यासगोर मांडला असल्याचे सगजते, तसेच कोल्हापूरची जागा उबाठा गटाला मिळाली नाही तर कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात उबाठा गटाच्या अस्तित्वास धोका पोहचू शकतो ही बाब देखील त्यांनी गांभियनि पक्षश्रेष्टींकडे मांडली असल्याचे त्यांच्या जवळच्या कार्यकत्यांनी सांगितले. आगामी काळात होणारी विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उबाठा गटाची ताकद निर्माण करण्यासाठी लोकसभेची जागा किती महत्वाची आहे, याचा अहवाल नरके यांनी नेत्यांसमोर सादर केला असल्याचे समजते. त्यानुसार उबाठा गटाकडून त्यांना उमेदवारीसाठी हिरवा कंदिल दाखविला असल्याची चर्चा आहे, पण कॉंग्रेस आणि उबाठा गटातील जागा वाटपाचा तिढा आजही कायम आहे.
संपूर्ण मंडलिक कुटुंब उतरले प्रचाराच्या मैदानात
आपल्या विरोधात कोण उमेदवार आहे ? याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी खासदार संजय मंडलिक यांच्यासह त्यांचे तिन्ही चिरंजीव प्रचाराच्या मैदानात उतरले आहे रस्ते, आरोग्य, विमानतळ, रेल्वे आदी विविध विभागांच्या माध्यमातून तब्बल २ हजार कोटींची विकासकामे झाल्याचा खासदार मंडलिक यांचा दावा आहे. त्यापैकी रस्ते आणि आरोग्य विभागासाठी ७०० कोटी निधी दिला असल्याचे त्यांच्या प्रचारदौऱ्यात सांगितले जात आहे. गेल्या दोन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून झालेल्या विकासकामांचे लोकार्पण आणि नवीन विकासकामांच्या उद्घाटनाच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचारदौरा सुरु केला आहे. मतदारसंघातील संपर्कदौ-याचा त्यांनी आराखडा तयार केला असून दौरा सुरु आहे.
श्रीमंत शाहू छत्रपती यांची 'गुगली' कायम
महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला मिळाल्यास श्रीमंत शाहू छत्रपती हेच उमेदवार असतील अशी जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांमधूनही त्याला काहीअंशी पुष्टी मिळत आहे. पण मी लोकसभा निवडणूक लढविणारच असा कोणताही ठोस निर्णय श्रीमंत शाहू छत्रपती यांनी जाहीर केलेला नाही. माध्यम प्रतिनिधींनी याबाबत वेळोवेळी विचारणा केली असता त्यांच्याकडून उमेदवारीबाबत 'गुगली' टाकली जात आहे.