कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे ? संजय मंडलिक विरुद्ध श्रीमंत शाहू छत्रपती लढत होण्याची शक्यता
कोल्हापूर/ प्रतिनिधी
लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीतील प्रमुख दोन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे या दोन्ही पक्षांना मागील लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या आपल्या काही जागा सोडाव्या लागणार आहे. मतदारसंघातील स्थिती लक्षात घेऊन ती जागा कोणाला मिळणार, याचे सूत्र ठरवावे, यावर तीनही पक्षांचे एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव आणि कोल्हापूरच्या जागेबाबत मविआकडून कोण लढणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. जळगावची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याचे निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे कोल्हापुरात खासदार संजय मंडलिक विरुद्ध श्रीमंत शाहू महाराज छत्रपती अशी लढत होण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसची कोल्हापूर जिह्यातील ताकद लक्षात घेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी काँग्रेस नेते आग्रही होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली असून त्याबदल्यात जळगावची जागा काँग्रेसकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली जाणार आहे. तर जळगावची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिली जाणार आहे.
मविआकडून शाहू महाराज छत्रपती लढणार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी शाहू महाराज छत्रपती यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर शाहू महाराज मविआकडून लोकसभा निवडणक लढवण्यास तयार झाले असल्याचे दिसत आहे. स्वत? शाहू महाराजांनी विविध कार्यक्रमांमध्ये बोलताना याबाबतचे संकेत दिले आहेत. मविआच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा जवळपास काँग्रेसकडे गेली असून तेथून शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात.