मी कोल्हापुरात आलो की विरोधक बैचेन होतात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर प्रतिनिधी
मी जिथे बसतो, ती जागा निवडून आणतो, हे माहिती असल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे मी कोल्हापुरात आलो की विरोधक बैचेन होतात, त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात होते. यापुर्वी महापूर, कोरोना काळातही मी कोल्हापुरात तळ ठोकून होतो. त्यावेळी विरोधक झोपले होते का, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रविवारी शहरात काढलेल्या रोड शो दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पराभव दिसत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस कोल्हापुरात तळ ठोकून आहेत, या विरोधकांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्या जनतेने मान गादीला, मत मोदीला.., असा निर्धार केला आहे. त्याचे हे दृश्य या रॅलीतून दिसून येत आहे. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. हेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदारांना मतदानासाठी बाहेर काढत महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार कोल्हापुरात येत असल्याच्या विरोधकांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापुरात आलेला महापूर, त्यानंतर कोरानाचे संकट या संकट काळातही मी कोल्हापुरात तळ ठोकून होतो. यावेळी विरोधकांची तोंड बंद का होती, त्यावेळी मी कोल्हापुरात आलेलो तेंव्हा विरोधक झोपले होते का? असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. मी जिथे बसतो, ती जागा निवडून आणतो, हे माहिती असल्यानं मी कोल्हापुरात आलो की विरोधक बैचेन होतात. त्यांना पराभव दिसून लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आज महायुतीसोबत सर्व पक्ष आहेत. महायुतीमधील सर्व नेते, कार्यकर्ते ताकदीने प्रचारामध्ये उतरले आहेत. यासर्वांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढल्यास गतवेळीपेक्षा अधिक मताधिक्याने खासदार प्रा. मंडलिक विजयी होतील असा, विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवाजीराव जाधव, वीरेंद्र मंडलिक आदीं उपस्थित होते.