जिममध्ये उत्तेजक द्रव्यांची विक्री, 64 बाटल्या जप्त ! कळंबा येथील जिम व प्रोटीन दुकानावर कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
शरीरास अपायकारक असणाऱ्या मेफेनटेरमाईन सल्फेट या उत्तेजक द्रव्यांची विक्री करणाऱ्या दुकान व जीमवर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये मेफेनटेरमाईन सल्फेटच्या 64 बाटल्या, इंजेक्शन असा सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दुकान व जिम मालकास अटक केली आहे. प्रशांत महादेव मोरे (वय 34 रा. मोरेवाडी, ता. करवीर), ओंकार अरुण भोई (वय 24 रा. सुप्रभात कॉलनी, आपटेनगर) अशी त्यांनी नावे आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी 5 दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरासह जिह्यातील जिममध्ये शरीरास अपायकारक असणाऱ्या मेफेनटेरमाईन सल्फेट या घातक औषधांची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना मिळाली होती. यानुसार पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी यासाठी 2 पथके तयार केली. कळंबा येथील सुर्वेनगर परिसरात एस प्रोटीन्स व एस फिटनेस या दोनही ठिकाणी मेफेनटेरमाईन सल्फेट या औषधची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरुवारी छापा टाकला. यावेळी शरीर सदृढ बनविण्यासाठी लागणाऱ्या प्रोटीन्स सोबत मेफेनटेरमाईन सल्फेट या इंजेक्शन मिळून आली. अंदाजे 64 हून अधिक इंजेक्शन व सिरींज मिळून आल्या. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दोघांवर मानवी जिवितास अपायकार वस्तूची विक्री, इतरांचा जीव धोक्यात घालणारी कृती, अंमली पदार्थांची विक्री करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार विलास किरोळकर, संजय पडवळ, दिपक घोरपडे, संजय कुंभार, अमोल कोळेकर, प्रशांत कांबळे, संतोष पाटील, राजु कांबळे यांनी ही कारवाई केली.
जिह्यातील पहिलीच कारवाई
कोल्हापूर जिह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. जिम व दुकानामध्ये अशा प्रकारच्या औषधांची राजरोसपणे विक्री केली जाते. मात्र या विरोधात कारवाई केली जात नव्हती. मात्र आता स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली आहे.
मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन एच प्रवर्गात
मेफेनटेरमाईन सल्फेट हे इंजेक्शन एच प्रवर्गात मोडते. ते फक्त डॉक्टरच्या प्रिक्रीपशन व्दारेच विक्री करणे बंधनकारक आहे. सदरची औषधे डॉक्टरांचे चिठ्ठी शिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहित नसतांना, ग्राहकांना विक्री केली जाते. अशा औषधाचे वापरामुळे ग्राहकांचे स्वास्थास्य/जिवीतास हानी होण्याची शक्यता आहे. इंजेक्शन या औषधाचा उपयोग हा लो ब्लड प्रेशर या आजारात केला जातो, सदर औषधाचे दुष्परिणामामुळे औषध घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंमली पदार्थाविरोधात मोहीम तीव्र
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिह्यात अवैद्य धंदे, बेकायदेशीर मद्य आणि अंमली पदार्थाविरोधात मोहिम तीव्र करण्यात आली आहे. आपल्या परिसरात बेकायदेशीर रित्या सुरु असणाऱ्या व्यवसायांची माहिती पोलिसांना द्यावी. तक्रार देणाऱ्याचे नांव गोपणीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केले आहे.
इंजेक्शन घातक ... आहारच भारी
हे इंजेक्शन तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या देखरेखी खालीच घ्यावे लागते .कारण त्या इंजेक्शनचा प्रभाव शरीरात खूप मोठे बदल करण्यात होतो.त्या इंजेक्शनमुळे छातीचे ठोके वाढतात. किंबहुना शरीराच्या सर्व शरीरातील सर्व संवेदनावर इंजेक्शन प्रभाव टाकते. अत्यावश्यक उपचारातच त्याचा वापर केला जातो .पण कोठेही हे इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शन शिवाय मिळत असेल व त्याचा वापर होत असेल तर ते खूप धोकादायक आहे. एखाद्याच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे .आपल्या आहारातील पालेभाज्या फळभाज्या कडधान्य मांसाहार यात खूप प्रभावी घटक आहेत. जे व्यायामपटूंना पूरक बळ देऊ शकतात. पण नको त्या त्याचा वापर होत आहे .तो खूप घातक आहे.
डॉ. अक्षय बाफना- हृदयरोग उपचार तज्ञ, सीपीआर हॉस्पिटल