उचगाव येथील मोठा ओढा बिल्डराने मुजविला; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; नागरिकांच्यातून संतप्त भावना
उचगाव/प्रतिनिधी
कोल्हापूर हुपरी रस्त्यावरील उचगाव हद्दीत असणारा मोठ्या ओढयाचे पात्र एका बिल्डरने छोट्या सिंमेट पाईप घालून मुजवून टाकला आहे. नैसर्गिक ओढ्याचे पात्र मुजवल्यामुळे भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असुन सार्वजनिक बांधकाम खाते ,महसूल खाते व उचगाव ग्रामपंचायत यांचे याकडे 'अर्थ ' पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे बिल्डराचे धाडस वाढून पूर्ण ओढा बंद करण्याचे धारिष्ट त्याने दाखवलेले आहे. ओढ्याच्या लागून असलेल्या बऱ्याच जणांनी ओढ्यावर अतिक्रमण केलेले आहे.यावर कारवाई होणार का असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर हूपरी रस्त्यावर उचगाव चौका नजीक साधारणतः उजळाईवाडी, सरनोबतवाडी मार्गे उचगावातून मोठा ओढा वाहतो.तो पंचगंगा नदी पर्यंत जातो. यापूर्वी सोळा सतरा वर्षांपूर्वी पावसाळ्यात नेहमीच रस्त्यावर पाणी येत होते.यामुळे वाहतूक तासान तास खोळबूंन राहत होती. या ओढ्यातून पावसाळ्यात आलेल्या पाण्यातून काही जण वाहून गेल्याची घटना घडल्या. दैनिक तरुण भारत संवाद ने या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
तत्कालीन आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी या रस्त्याची उंची वाढवून मोठा पूल बांधून घेतला. तेव्हापासून नागरिकांच्या वरील, वाहनधारकांचा मोठा धोका टळला. आत्ताच्या घटनेने आमदारांच्या चांगल्या हेतूलाच हरताळ फासण्याचे काम बिल्डरने केल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
पूल बांधून झाल्यावर काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील काही बिल्डर यांनी ओढ्यातच बांधकामे केल्याने नैसर्गिक ओढापत्राला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. ओढ्याचे काही ठिकाणी लहान गटर मध्ये रूपांतर झालेले आहे. एवढे सर्व घडत असताना सार्वजनिक बांधकाम खाते महसूल खाते यांनी या घटना गांभीर्याने न घेता लोकांच्या जीवाशी खेळण्याची घातक भूमिका घेतल्याने जनतेतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. सुरुवातीस ओढ्यावरील पुलाला साधारणतः एक वर्षांपूर्वी बिल्डराने चक्क पत्रे लावून पॅक केले. याबाबत अनेकांनी आवाज उठवला असता काहीं नी कचरा टाकला जातो यासाठी पत्रे लावण्याची सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही हात वर केले. मात्र पत्रे लावण्याचा खरा हेतू आता उघड होत आहे. ओढ्या जवळील प्लॉटची सर्व माती ओढ्यामध्ये टाकून सिमेंटच्या छोट्या पाईप पाण्यासाठी घातलेले असून पाण्यामध्ये कॉलमही उभारण्यात आलेले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारले असता त्यांनी बांधकाम करणार आहे इतकेच आम्हाला कळविले असून ओढ्यावरील मुजविण्याबाबत आम्ही अनभीज्ञ आहे असे सांगितले. ओढा मुजविल्यामुळे शेतीला, जनावरांना वापरण्यात येणारे पाणी मिळणार नाही च मात्र पाऊस ज्यादा पडल्यास परिसराला मोठ्या पूर सदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. शेजारील प्लॉट धारकांनी सुद्धा ओढ्यावर बांधकाम केलेली आहेत.
अधिकाऱ्यांच्या जबाबदारी झटकून देणाऱ्या प्रतिक्रिया
उचगाव ग्रामसेवक दत्ता धनगर यांना विचारले असता त्यांनी याबाबत मला काहीच माहित नाही असे उत्तर दिले. उचगाव तलाठी शरद पाटील यांनी आम्ही याचा पंचनामा करून वरिष्ठांच्या कडे दिला आहे त्यामुळे आमचे काम आम्ही केले आहे अशी प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता नंदीवाले यांना याबाबत विचारले असता ओढ्याची जबाबदारी ही महसूल खात्याकडे येते आणि रस्त्यावरील पत्रे आम्ही काढू अशी प्रतिक्रिया दिली. ओढ्या वरील बांधकाम मोठ्या गतीने चालू असून माती तसेच मुरूम ओढून पसरून जेसीबीच्या साह्याने ओढा मुजवून टाकण्याचे धारिष्ट बिल्डर करीत आहेत.जनतेला कोणी वाली आहे का , सर्वसामान्य जनतेला धोका पोहचविणाऱ्यांवर कडक कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.