कोल्हापूरने जपलाय कलेचा वारसा
कोल्हापुरातील लघुपटाला पाचव्यांदा फिल्मफेअर अॅवार्ड : मालिकांसह चित्रपटांच्या चित्रिकरणाला वेग
कोल्हापूर :
कोल्हापूर कलापंढरी असल्याने येथील अनेक दिग्गज दिग्दर्शक, कलाकार, निर्मार्त्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली. जयप्रभा स्टुडिओला एकेकाळी चित्रपट सृष्टीची शान मानले जायचे. लाईट, कॅमेरा, ऍक्शननी इथला परिसर गजबजून जायचा. अनेक कलाकारांनी आपल्या चित्रपट श्रुष्टीचा श्रीगणेशा इथूनच केला. या कलापंढरीचा वारसा फिल्मफेअर अॅवार्डच्या माध्यमातून नवीन पिढीने जपला आहे. गेल्या पाच वर्षात पाच शॉर्टफिल्मला फिल्मफेअर अॅवार्ड मिळाला आहे. तर येथील नाटककारांच्या नाटकांनीही स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावून राज्यात कोल्हापूरचा झेंडा फडकवला आहे.
कोल्हापुरात पन्हाळा, राधानगरी, मसाई पठार, जोतिबा डोंगर, शिवाजी विद्यापीठ यासह अनेक चित्रिकरणाची ठिकाण निर्मात्यांना खुनावत आहेत. परंतू येथील जुना जयप्रभा स्टुडीओ बंद असून, चित्रनगरीमध्येही अद्याप सर्वोत्परी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कोल्हापुरात चित्रीकरण करण्यास निर्मार्ते धजावत नाहीत, ही खरी वस्तूस्थिती आहे. कोरोना कालावधीमध्ये कोल्हापूर चित्रनगरीला चांगले दिवस आले होते, तीन मराठी व एका हिंदी मालिकेचे चित्रिकरण येथे सुरू होते. लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्या अन् येथील मालिकांचे चित्रिकरण बंद होऊन ते दुसरीकडे गेले. परिणामी कोल्हापुरातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्मार्ते, दिग्दर्शकांमध्ये नाराजी होती. पण निर्धार, महाकलंदर, सॅटर्डे नाईट, पोटरेट चित्रपटांचे चित्रिकरण सुरू असताना पुन्हा कलाकारांना चांगले दिवस आले. सध्या कोल्हापुरात तुळजाभवानी, ती कळी, सुंदरी भाग दोन या मालिकांचे चित्रिकरण सुरू आहे. तर एक हिंदी चित्रपट चित्रिकरणासाठी येणार असल्याने कलाकार, तंत्रज्ञ खुश आहेत. त्यापलिकडे जाऊन मालिकांसह कोल्हापूरच्या कलाकारांनी लघुपट चित्रिकरणाकडे लक्ष केंद्रित करून अप्रतिम लघुपट चित्रित केले आहेत. हे लघुपट चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करीत फिल्मफेअर अॅवार्डही मिळवला आहे. त्यामुळे येथील कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काहांच्या रोजगाराचा प्रश्न मिटल्याच्या भावना कलाकारांकडून व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्र शासनाने लक्ष देऊन प्रॉडक्शन कंपनीला चित्रनगरीत हवी ती साधनसामुग्री पुरवण्याची गरज असल्याचे कलाकारांकडून सांगण्यात येत आहे. कारण कोल्हापुरातील 500 पेक्षा जास्त कुटुंब कलानगरीवर अवलंबून आहेत. येथे मालिका, चित्रपट, लघुपट निर्मिती झाली तरच त्यांच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालणार आहे.
या लघुपटांना मिळाले फिल्मफेअर अवॉर्ड
2018-19 उमेश बगाडे यांच्या अनाहत, 2019-20 ला सचिन सूर्यवंशी यांच्या शॉकरसिटी, 2020-2021 ला रोहित कांबळे यांच्या देशी, 2021-2022 सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा, 2023-24 संजय देव यांच्या देशकरी लघुपटाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.
नाट्यालेखक, दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक यांच्या चित्रपटालाही अॅवार्ड
नाट्यालेखक, दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक यांच्या ‘मंडळ आभारी आहे’ या चित्रपटाला तामिनाडू, केरळ, झारखंड, बिहार आदी ठिकाणचे अॅवार्ड मिळाले आहे. तर मुंबई येथे फेब्रुवारीत होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलसाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. तर रासपर्व या नाटकालाही अॅवार्ड मिळाला आहे.