Kolhapur Weather | कडाक्याच्या थंडीनं कोल्हापूर गारठलं ; तापमान 13 अंशांवर
कोल्हापुरात कडाक्याची थंडी
कोल्हापूर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात दिवसागणिक वाढणाऱ्या थंडीमुळे शहरासह ग्रामीण भागात गारठा वाढू लागला आहे. यंदाच्या हिवाळ्याने कोल्हापूरकरांना अक्षरशः हुडहुडी भरली असून, तापमान तब्बल १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. कडाक्याच्या थंडीने संपूर्ण जिल्हा गारठला. भारतीय हवामान विभागाने राज्यात थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांसाठी थंडी ही कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
शहरात सायंकाळ सुरू होताच थंडीचा जोर आणखी वाढतो. अनेक भागांमध्ये हातपाय गोठवणारी थंडी जाणवत असून नागरिक सायंकाळनंतर बाहेर पडताना स्वेटर, जॅकेट, कानटोपी यांसारखे उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत. काही भागांत तर लोकांना हुडहुडी भरावी अशी परिस्थिती होत असल्याने, थंडीपासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला, आणि बाजारपेठांमध्ये शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे.